साथीच्या आजारांची टांगती तलवार | पुढारी

साथीच्या आजारांची टांगती तलवार

पुणे : पावसाळ्यात दूषित अन्न आणि पाण्यातून आजार पसरण्याची शक्यता असते. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने साथीच्या आजारांचे कमी रुग्ण आढळून आले. मात्र, आता शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच साथीच्या आजारांचे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. फ्लूच्या साथीप्रमाणेच कावीळ, टायफॉइड, डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया या आजारांपासूनही काळजी घेणे गरजेचे असते. या पार्श्वभूमीवर सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता असते. कोणतेही दुखणे अंगावर काढू नये, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

काय त्रास होतो?
पावसाळ्यात कॉलरा, टायफॉइड, डायरिया, हिपॅटायटिस ए आणि ई, कावीळ, अन्नविषबाधा, मलेरिया आणि डेंग्यू यांसारख्या आजारांचा त्रास होतो. उलट्या, मळमळ, ओटीपोटात दुखणे आणि ताप, थकवा आणि भूक मंदावणे, यांसारखी लक्षणे दिसू शकतात. या काळात वृध्द व्यक्ती, लहान मुले, गर्भवती महिला
यांची जास्त काळजी घेण्याची गरज असते.

ही घ्या काळजी
1) पाणी उकळून प्यावे
2) उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे
3) ताजे अन्न आणि फळांचे सेवन करावे
4) शौचालयात स्वच्छता राखावी
5) मुलांना हात धुण्याचे महत्त्व पटवून द्यावे
6) शौचालय वापरल्यानंतर, पाळीव प्राण्यांना हाताळल्यानंतर, स्वयंपाक करण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी आणि नंतर, डायपर बदलल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत
7) खाण्यापूर्वी सर्व कच्च्या भाज्या आणि फळे धुऊन घ्या

जून महिन्यातील साथीच्या आजारांची स्थिती
व्हायरल हिपॅटायटिस : 115
टायफॉइड : 71
डेंग्यू : 17
चिकुनगुनिया : 11
गॅस्ट्रो : 12
स्वाइन फ्लू : 2
डायरिया : 161

टायफॉइड, हिपॅटायटिस ए, पोलिओ आणि फ्लूसारख्या प्रतिबंधित रोगांपासून दूर राहण्यासाठी लसीकरण करा. मसालेदार किंवा पचायला जड अन्न खाणे टाळा. पालक, कोबी तसेच हिरव्या पालेभाज्यांचे सेवन न करणे योग्य राहील. जास्त वेळ ठेवलेले अन्न खाऊ नका. कारण, तुम्हाला अन्नातून विषबाधा होऊ शकते. जंक फूड, तेलकट आणि हवाबंद डब्यातील अन्नपदार्थांचे सेवन टाळा. आहारात ताजी फळे, भाज्या आणि तृणधान्य समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. सतत उलट्या आणि जुलाब होत असतील, शौचावाटे रक्त येत असल्यास, ताप, चक्कर येणे किंवा ओटीपोटात असह्य वेदना, लघवीच्या रंगात बदल होत असल्यास
तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

                                     – डॉ. सम्राट शहा, इंटरनल मेडिसीन एक्सपर्ट

Back to top button