येळसे : भात लावणीसाठी शेतकर्‍यांची लगबग | पुढारी

येळसे : भात लावणीसाठी शेतकर्‍यांची लगबग

येळसे : पुढारी वृत्तसेवा :  मावळ तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांची भाताच्या लावणीसाठी लगबग सुरु झाली आहे. मावळ तालुका हा भात पिकासाठी प्रसिद्ध आहे. मावळात आंबेमोहर, साळ, दोडकी, कोळम, इंद्रायणी या पारंपारिक भातबियाणांसह कोकणी, पार्वती, फुलेसमृध्दी, बासमती, रूपाली, रत्ना, साईराम, सोनम, सुरूची, वैष्णवी व तृप्ती या संकरित विकसित भातबियाणांच्या वाणालाही मावळात उत्तम प्रतिसाद आहे.

मावळातील पश्चिम खो-यातील डोंगरी भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने याठिकाणी आंबेमोहोर, साळ, कोळम आणि इंद्रायणी भातांची मोठ्याप्रमाणात लागवड केली जाते. तर मावळ तालुक्यात पारंपारिक, चारसुत्री, पट्टा पद्धत, एस आर टी, व ईतर पद्धतीने भात लागवड केली जाते. गेल्या दोन तीन दिवसापासून मावळात रिमझिम पाऊसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यानी भात लावणीला सुरुवात केली आहे.

पवनमावळ परिसरातील शेतकर्यांनी पवनाधरणाच्या पाण्यावर भात पेरणी केली होती. व ती भात रोेपे चांगल्या प्रमाणात उगवुन आली आहे. व ती लावण्या योग्य झाल्याने तसेच पाऊस चांगला झाल्याने भातखाचरात मुबलक पाणी झाल्याने शेतकर्यांनी आता भात लावणीला सुरुवात केली आहे. तर काही शेतकरी आपल्या भात रोपांना खते मारण्याच्या तयारीत आहे. तर काही शेतकरी पुढील 10 ते 15 दिवसात भात लावणीला सुरुवात करणार आहे. मात्र पाऊसाची उघडझाप सुरुचं असल्यामुळे भात लावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

Back to top button