टेंडर मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक | पुढारी

टेंडर मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

पुणे : पुढारी वृत्तसेवा: रेल्वेत कामाला असल्याची बतावणी करीत पेपर बॅग्ज आणि फूड सप्लायचे टेंडर मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेची 1 लाख 12 हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी जोएल फर्नांडिस (रा. वानवडी) नावाच्या व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वानवडी येथील 44 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना 2019 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा पेपर बॅग तयार करण्याचा छोटा व्यवसाय आहे.

आरोपी जोएल याने फिर्यादी महिलेला रेल्वेत कामाला असल्याची बतावणी करून पेपर बॅग्ज आणि त्यांच्या पतीला फूड सप्लायचे टेंडर मिळवून देतो, असे सांगितले. त्यासाठी वेळोवेळी जोएल याने फिर्यादींकडून 1 लाख 12 हजार 980 रुपये घेतले. फिर्यादी महिलेने आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत पैसे हवाली केले. मात्र, त्यानंतरदेखील त्यांना रेल्वेतील कोणतेही टेन्डर मिळाले नाही. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास वानवडी पोलिस करीत आहेत.

Back to top button