पीएमपीच्या पुणे स्टेशन आगारात नव्या ई-बसमधून धूर | पुढारी

पीएमपीच्या पुणे स्टेशन आगारात नव्या ई-बसमधून धूर

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पीएमपीच्या पुणे स्टेशन आगारात नव्या ई-बसमधून धूर निघाल्यामुळे आगारात मोठी धावपळ उडाली.
या वेळी तातडीने अग्निशमन दलाला बोलाविण्यात आले. त्यामुळे आग पसरली नाही. ई-बसला लागलेल्या आगीमुळे पीएमपीच्या वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने पुणे शहरात पर्यावरणपूरक सेवा पुरविण्यासाठी इलेक्ट्रिक बस खरेदी केल्या. पहिल्या टप्प्यातील 295 ई-बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून, त्याद्वारे शहरात सेवा पुरविली जात आहे.

आणखी 300 ई-बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. असे असतानाच ई-बसमधून निघणार्‍या धुराच्या व्हिडीओमुळे बसच्या दर्जाबाबत चिन्ह निर्माण झाले असून, कर्मचार्‍यांमध्येही विविध चर्चांना उधाण आले आहे. ई-बसमधून धूर निघण्याची घटना घडली त्या वेळी आगारात कामावर असलेल्या कर्मचार्‍यांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळविले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नाही.

ई-बसमधून धूर निघण्याची घटना दोन दिवसांपूर्वी पुणे स्टेशन आगारात घडली. यासंदर्भात माहिती घेतली आहे. कोणतीही तांत्रिक समस्या नव्हती. चालकाने गाडी आगारात आणल्यानंतर सिमेंटचे छत ई-बसला वरून घासले. ई-बसची बॅटरी आणि इलेक्ट्रिकल सिस्टिम छतावरच असल्यामुळे या वेऴी छत आणि बॅटरीच्या झालेल्या घर्षणामुळे धूर येऊ लागला. त्यामुळे ही घटना घडली आहे. संबंधितांची चौकशी सुरू आहे.

                                            – सतीश गाटे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल

Back to top button