पिंपरी : शाहिरी लोककलेवर महिलांची छाप | पुढारी

पिंपरी : शाहिरी लोककलेवर महिलांची छाप

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आपल्या संस्कृतीमधील अनेक गोष्टींवर फक्त पुरुषांची मक्तेदारी होती; पण हळूहळू महिलाही पुरुषप्रधान क्षेत्रात अग्रेसर होत आहेत. शाहिरी आणि पोवाडा यासारख्या धारदार आवाज असणार्‍या पुरुषांच्या क्षेत्रात आता महिलाही पुढे असल्याचे दिसत आहे. पिंपरी चिंचवड येथील संजीवनी महिला शाहिरी पथक गेली अकरा वर्षे पोवाडा आणि शाहिरी सादर करुन ही लोककला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

आताच्या महिलांनी घरातील जबाबदारी सांभाळून बुद्धिमत्तेपासून ते ताकदीच्या क्षेत्रातही पुुरुषांबरोबर नावलौकीक मिळविला आहे. अगदी संशोधनापासून ते कुस्ती आणि बॉक्सिंगसारख्या क्षेत्रात महिला पुढे जात आहेत. पोवाडा आणि शाहिरी या लोककलांकडे सहसा फार कोणी वळताना दिसत नाही. पहाडी आवाजात ताकदीचा पोवाडा सादर करुन श्रोत्यांसमोर ऐतिहासिक प्रसंग जिवंत करणे हे मोठे कौशल्याचे काम असते.

गेली अकरा वर्षे हे महिला शाहिरी पथक पारंपरिक वेशभूषा, डोक्यावर फेटा, डफ आणि तुणतुण्याच्या साथीने पोवाडा गाजवित आहेत. पथकाच्या अध्यक्ष वनिता मोहिते यांनी या शाहिरी पथकाची स्थापना केली. त्यांच्या पथकात कांचन जोशी, प्रचिती भीष्णूरकर, स्मिता बंदिवडेकर, कीर्ती मराठे, भक्ती फिसके, चित्रा कुलकर्णी, शाल्मली जोशी, ईशा बंदिवडेकर, भक्ती फिसके, आदिती फिसके अशा व्यवसायिक, नोकरदार, शिक्षिका आणि आयटीतील महिलांचा समावेश आहे.

आतापर्यंत पथकांचे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर दोनशे ते अडीचशे कार्यक्रम झाले आहेत. यामध्ये ऐतिहासिक, सामाजिक, स्त्री मुक्ती अशा ज्वलंत विषयावर पोवाडे सादर केले आहेत. पोवाडा सादर करताना त्याला नाट्यमय रूप देण्यासाठी स्टेजवर स्किटदेखील सादर केले जाते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव, बाल शिवाजी, मावळे आदींचे सादरीकरण केले जाते. त्यामुळे काही बालशाहिरांचादेखील पथकांमध्ये समावेश आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रम बंद ठेवण्यात आले होते. तरीदेखील ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी पथकातील सर्वच महिला उत्साहित आहेत. दोन वर्षे बंद असलेल्या कार्यक्रमांना आता पुन्हा प्रतिसाद मिळत आहे.

माझी मुलगी शाहीर योगेश दिवाकर यांच्याकडे पोवाडा शिकत होती. ती शिकत असताना मलाही पोवाडा आणि शाहिरीविषयी कुतूहल निर्माण झाले आणि मी पोवाडा शिकण्याचे ठरविले. हळूहळू आमच्या पथकात महिला शाहिरांची संख्या वाढू लागली. आम्ही राज्यात आणि राज्याबाहेरदेखील पोवाड्याचे कार्यक्रम सादर केले आहेत. कोरोनाकाळात काम बंद होते. आता पुन्हा सुरुवात केली आहे.

-वनिता मोहिते, अध्यक्षा, संजीवनी महिला शाहिरी पथक

 

Back to top button