पप्पू येनपूरे टोळीविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई, गुन्हेगारी टोळ्यांविरुद्धची 49 वी कारवाई | पुढारी

पप्पू येनपूरे टोळीविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई, गुन्हेगारी टोळ्यांविरुद्धची 49 वी कारवाई

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : शहरातील संघटीत गुन्हेगारी बरोबरच सराईतांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. मोक्का, तडीपारी व स्थानबद्धतेनुसार सराईतांवर कारवाई केली जाते आहे. दरोड्याची तयारी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, घात शस्त्राद्वारे कात्रज, आंबेगाव परिसरात दहशत निर्माण करणार्‍या पप्पू येनपूरे टोळीविरुद्ध पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

टोळीप्रमुख प्रविण पप्पू  येनपूरे (वय 27, रा. अटल चाळ, आंबेगाव खुर्द) व त्याचे साथीदार अजित अंकुश धनावडे (वय 24, रा. सच्चाईमाता नगर, आंबेगाव खुर्द), अभिजीत नंदु बोराटे (वय 31, रा. आंबेगाव खुर्द) अशी कारवाई केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

तडीपार करून ही गुन्हेगारीत परिणाम नाही

यापूर्वी संबंधीत टोळीवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तसेच तडीपारीची कारवाई केली होती. मात्र तरी देखील त्याच्या गुन्हेगारी वर्तनात काही एक परिणाम झाला नाही.

पप्पू येनपूरे हा 2016 पासून संघटीतपणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत आहे. येनपूरे हा प्रत्येक गुन्ह्याचे वेळी सोबत वेगवेगळे साथीदार घेऊन आपल्या टोळीची दहशत व वर्चस्व् राखण्याकरीता दरोड्याची तयारी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्र, दहशत माजविणे या सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे चढत्या क्रमाने केलेले आहेत.

त्यामुळे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला.

पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्यामार्फत तो अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे सादर केला.

पप्पू येणपुरे व त्याच्या साथीदारांची गुन्हेगारी रेकॉर्ड कुंडली पाहता डॉ. शिंदे यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन त्याला मंजूरी दिली.

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण करीत आहेत.

Back to top button