पिंपरी : दोन वरिष्ठ निरीक्षकांसह चार जणांची उचलबांगडी | पुढारी

पिंपरी : दोन वरिष्ठ निरीक्षकांसह चार जणांची उचलबांगडी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  अवैध धंद्यांना अभय दिल्याचा ठपका ठेवून दोन वरिष्ठ निरीक्षकांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. तसेच, कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून दोन फौजदारांनादेखील नियंत्रण कक्षाशी संलग्न कऱण्यात आले आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सोमवारी (दि. 4) रात्री याबाबतचे आदेश दिले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड, उपनिरीक्षक इकबाल इस्माईल शेख, उपनिरीक्षक अशोक नागू गांगड अशी संलग्न करण्यात आलेल्या पोलिस अधिकार्‍यांची नावे आहेत. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. याची गंभीर दखल घेत निगडीचे वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न केले आहे.

तसेच, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड यांना देखील जबाबदार धरून त्यांना आरसीपी पथक येथे संलग्न कऱण्यात आले आहे. याव्यतिरिक्त आळंदी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक इकबाल शेख, अशोक गांगड या दोघांना देखील नियंत्रण कक्षाशी संलग्न केले आहे. या दोन अधिकार्‍यांना कर्तव्यात कसूर केल्याने त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याचे पोलिस आयुक्त कार्यालयातून सांगण्यात येत आहे.

धाबे दणाणले…!
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दोन वरिष्ठ निरीक्षकांची उचलबांगडी केल्याने अन्य अधिकार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. याबाबत बोलताना आयुक्त शिंदे म्हणले की, शहरात अवैध धंद्यांचा समूळ नाश करण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले आहेत. मात्र, तरी देखील काहीजण जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचे समोर आले. त्यामुळे काहीजणांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे देखील अवैध धंद्यांना पाठबळ देत असल्यास खपवून घेतले जाणार नाही.

Back to top button