बारावीसाठी कॉलेज बदलता येणार; विभागीय शिक्षण उपसंचालकांचा आदेश | पुढारी

बारावीसाठी कॉलेज बदलता येणार; विभागीय शिक्षण उपसंचालकांचा आदेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा: बारावीसाठी विद्यार्थ्यांना कॉलेज बदलता येणार आहे. तसा आदेश विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिला आहे.
विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी म्हटले आहे की, ‘विद्यार्थ्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय बदलण्याच्या कारणांची खातरजमा करून मंजूर जागांच्या मर्यादेत आणि जागा उपलब्ध असल्यास त्याप्रमाणे गुणवत्तेनुसार संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा.’ दरवर्षी शिक्षण घेत असलेले महाविद्यालय सध्याच्या घरापासून लांब असणे, पालकांची बदली होणे, वैद्यकीय कारणास्तव राहत असलेल्या परिसरात कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळणे, शाखा बदलून मिळणे,

विद्यार्थी राहण्याचा पत्ता बदलणे, विद्यार्थ्यांना बोर्ड बदलायचे आहे, अशा विविध कारणास्तव बारावीत कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत असते. या संदर्भात 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून कनिष्ठ महाविद्यालयाला मंजूर जागांच्या मर्यादेत व जागा उपलब्ध असण्याच्या अटीनुसार, बारावीसाठी महाविद्यालय बदलून देण्याची कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात आली आहे, असेही उकिरडे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

कनिष्ठ महाविद्यालय बदलण्याची कारणे आणि गुणवत्ता यांचे काटेकोर पालन करण्यात यावे. यामध्ये कोणतीही अनियमितता होणार नाही, याची दक्षता पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यांतील सर्व कनिष्ठ महाविद्यालये, उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी घेणे गरजेचे आहे.

                                             – औदुंबर उकिरडे, विभागीय शिक्षण उपसंचालक

Back to top button