प्रभागरचनेचा गोंधळ; निवडणूक आयोगाकडून एकच तारीख अन् आवक क्रमांकाची दोन पत्रे | पुढारी

प्रभागरचनेचा गोंधळ; निवडणूक आयोगाकडून एकच तारीख अन् आवक क्रमांकाची दोन पत्रे

पुणे : पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या प्रभागरचनेबाबत राज्य निवडणूक आयोगाची दोन परस्परविरोधी पत्रे समोर आली आहेत. त्यामधील एका पत्रात प्रभाग 12 आणि 13 मध्ये बदल केला नसल्याचे म्हटले आहे, तर दुसर्‍या पत्रात या प्रभागात बदल केले असल्याचे नमूद केले आहे. ही दोन्ही पत्रे एकाच तारखेची आणि एकच जावक क्रमांकाची आहेत. त्यामुळे आता आगामी महापालिकेची अंतिम प्रभागरचना संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरली होती. आता ही रचना अंतिम झाली असली, तरी त्यामधील गोंधळ चव्हाट्यावर येत आहेत.

माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी राज्य निवडणूक आयोगाची दोन वेगवेगळी पत्रे आता उजेडात आणली आहेत. त्यामुळे आता आणखी गोंधळ वाढला आहे. केसकर यांना आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याबाबत महापालिकेस दिलेल्या पत्राची जी प्रत देण्यात आली त्यात, बदल केलेल्या प्रभागांचे क्रमांक देण्यात आले आहेत. यात सुमारे 30 प्रभागांचे क्रमांक देण्यात आले आहेत. तर, त्याच वेळी आयोगाकडून पालिकेस पाठविण्यात आलेल्या याच पत्रात 32 प्रभागांमध्ये बदल केल्याचे दर्शविण्यात आले असून, त्यात प्रभाग रचनेत वादग्रस्त ठरलेल्या प्रभाग 12 आणि 13 या दोन प्रभागांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रभागांचा उल्लेख वगळता सर्व मजकूर सारखा
दोन्ही पत्रे एकाच दिवशीची आणि एकाच जावक क्रमांक असलेली आहेत. तसेच संबंधित दोन प्रभागांचा उल्लेख वगळता उर्वरित पत्राचा मजकूर सारखा आहे. त्यामुळे नेमके पत्र खरे कोणते, तसेच अशा प्रकारची दोन पत्रे करून पुणेकरांची, मतदारांची, तसेच महापालिकेची फसवणूक झाल्याचा आरोप केसकर यांनी केला आहे. तसेच या प्रभाग रचनेला स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Back to top button