अवैध संपत्तीप्रकरणी उपायुक्तावर गुन्हा; एक कोटी रुपयांची अपसंपदा आढळली | पुढारी

अवैध संपत्तीप्रकरणी उपायुक्तावर गुन्हा; एक कोटी रुपयांची अपसंपदा आढळली

पुणे: पुढारी वृत्तसेवा: एक कोटी रुपयांची अवैध संपत्ती जमवल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या उपायुक्तासह त्याच्या पत्नीवर कोथरूड पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय भास्कर लांडगे (वय 49) आणि त्यांची पत्नी शुभेच्छा (वय 43) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. लांडगे यांनी शुभेच्छा (वय 43) यांच्या नावे तब्बल 1 कोटी 2 लाख 60 हजार रुपयांची अपसंपदा जमवल्याची तक्रार एसीबीला मिळाली होती.

याची तपासणी केल्यानंतर त्यात तथ्य आढळले. सर्व खात्री झाल्यावर लांडगे यांनी ज्ञात उत्पन्नापेक्षा अतिरिक्त 31 टक्के अपसंपदा पत्नीच्या नावे जमा केल्याचे आढळले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या शीतल घोगरे तपास करीत आहेत. अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या पथकाने कारवाई केली.

लांडगे 2000 मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले. पहिली नेमणूक पथ विभागात झाली. 2003 मध्ये पाणी पुरवठा विभागात गेले. त्यानंतर त्याच वर्षी टिळक रोड क्षेत्रीय कार्यालय, त्यानंतर 2004 मध्ये पुन्हा पथ विभागात बदली झाली. यानंतर 2007 मध्ये वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय, 2009 मध्ये घोले रोड क्षेत्रीय कार्यालय, 24 मे 2010 रोजी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात बढती मिळाली.

मालमत्ता तपासणी
विजय लांडगे याच्या कुटुंबीयांच्या नावावर शहरात चार ठिकाणी व नाशिक जिल्ह्यात एक अशा पाच ठिकाणी मालमत्ता आढळून आल्या आहेत. मंगळवारी सकाळपासून या मालमत्तांची तपासणी सुरू केली आहे.

हेही वाचा

राज्यात आजपासून 3 दिवस मुसळधार; या भागात ‘रेड अलर्ट’, तर पुण्याला ‘ऑरेंज अलर्ट’

पुणे जिल्ह्यात 50 मिमीपेक्षा जास्त पावसाचा इशारा

 

Back to top button