पुणे : आणे पठारावरील उपसा सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर | पुढारी

पुणे : आणे पठारावरील उपसा सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्याच्या आणे पठार भागातील शेतीला कुकडी प्रकल्पातून बंदिस्त जलवाहिनीने उपसा सिंचन पद्धतीने पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे. राज्यातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

आणे पठार भागावरील आणे, नळावणे, शिंदेवाडी, पेमदरा येथील शेतकर्‍यांनी याप्रश्नी पाठपुरावा केला आहे. पठार भाग पाणी संघर्ष समिती, पठार विकास संस्था आणे, भारतीय किसान संघ, शेतकरी संघटना जुन्नर तालुका आदींच्या माध्यमातून वेळोवेळी शेतीपाण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. आणे पठार विकास संस्थेच्या माध्यमातून दिवंगत घमाजी शिंदे यांनीही पाठपुरावा केला होता. मात्र, आतापर्यंत याबाबत आश्वासने देण्यापलीकडे कार्यवाही झालेली नाही. आता नवीन सरकारने तरी आमच्या मागणीची योग्य ती दखल घ्यावी, असे पठार भागावरील नागरिकांचे म्हणणे आहे.

आणे पठारावर बाळासाहेब दांगट यांच्या आमदारपदाच्या कार्यकाळात पेमदरा परिसरात 79 एमसीएफटी क्षमतेचा बंधारा बांधण्यात आला. यामुळे पेमदरा व परिसरातील शेतकर्‍यांना बर्‍यापैकी फायदा झाला. या बंधार्‍यांतील पाणीवापराचे नियोजन शेतकरी करतात. पाणीबचतीसाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचनपद्धतीचा वापर करतात. ही सुविधा मर्यादित असल्याने कुकडी प्रकल्पातून उपसा सिंचन योजना राबविणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

साखळी उपोषणाचा निर्धार

पाणी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी पठार भाग पाणी संघर्ष समितीच्या वतीने नारायणगाव येथील कुकडी कॉलनीतील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. लवकरच आळेफाटा येथे पाणी हक्क परिषद घेण्याचे नियोजन असल्याचे मधुकर दाते यांनी सांगितले.

कुकडी प्रकल्पातून आणे घाटापर्यंत गणेश तलाव किंवा विठ्ठल तलावात बंद जलवाहिनीने पाणी आणून दिल्यास वेळ प्रसंगी आणे पठार भागावरील शेतकरी एकत्र येऊन आर्थिक भार उचलून सामूहिक पद्धतीने उपसा सिंचन योजना राबवू शकतात.

                                                                               – बाळासाहेब दाते, उपसरपंच

Back to top button