पुणे : भिगवणच्या सेवारस्त्याकडेच्या गटारी तुंबल्या | पुढारी

पुणे : भिगवणच्या सेवारस्त्याकडेच्या गटारी तुंबल्या

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्गाच्या अखत्यारीत येणार्‍या भिगवण भागातील सेवारस्त्याच्या कडेच्या दोन्ही बाजूच्या गटारी मोठ्या प्रमाणात तुंबल्या आहेत. त्याची दुर्गंधी सुटून व सांडपाण्याची घाण रस्त्यावर पसरत असल्याने या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या गटारी तातडीने स्वच्छ न केल्यास अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग जगताप यांनी पत्राद्वारे पाटस टोल प्लाझा व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाला दिला आहे.

याबाबत माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग हा भिगवणच्या मध्यातून जात असून, दोन्ही बाजूला सेवा रस्ता आहे. या सेवारस्त्याच्या कडेच्या भागातून पाण्याचा निचरा होण्यासाठी प्राधिकरणाने गटारींची सोय केलेली आहे; मात्र वर्षानुवर्षे या गटारी स्वच्छ न केल्याने त्या जागोजाग तुंबल्या आहेत. या गटारीत प्लास्टिक कचरा, लहान-मोठी झाडी उगवून इतरही असंख्य कचरा यात साचल्याने पाण्याचा निचरा होत नाही. गटारीतील पाण्याला काळाकुट्टपणा आला आहे. हे पाणी थेट वर्दळीच्या रस्त्यावर येऊन साचत आहे. त्यात आता पावसाळा आल्यामुळे या गटारीतील घाण सर्वत्र पसरू लागली आहे. या पाण्याला दुर्गंधी तर सुटत आहेच शिवाय नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसापूर्वीच गटारी स्वच्छ करणे गरजेचे बनले आहे.

या गटारी स्वच्छ न केल्यास मराठा महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे लेखी निवेदने महामार्ग प्राधिकरणासह आरोग्य विभाग, पोलिस ठाणे आदींना देण्यात आले आहे.

Back to top button