पुणे : नाशिक महामार्गावरील सेवारस्ते पाण्याखाली | पुढारी

पुणे : नाशिक महामार्गावरील सेवारस्ते पाण्याखाली

चाकण : पुढारी वृत्तसेवा : चाकण परिसरात पुणे-नाशिक महामार्गालगत सेवारस्त्यांच्या लगतचे नाले गायब झाले आहेत. ज्या ठिकाणी नाले आहेत, त्या नाल्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने त्यांचा प्रवाह बंद झाला आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण होत आहे.

अनेक दिवस दडी मारून बसलेला पाऊस चाकण परिसरात आता अधूनमधून दमदार हजेरी लावत आहे. मात्र, सखल भागात आता मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. रस्त्यालगतच्या गटारींची पुरेशी स्वच्छता न झाल्याने घाण, कचरा साचत गेला असून, अनेक व्यावसायिकांनी हे नाले बंद केले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत असून, सेवारस्त्यांना नद्यांचे स्वरूप आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

चाकणमध्ये तळेगाव चौक आणि आणि आंबेठाण चौक येथे सेवारस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पाणी वाहून जाण्यास वाट नसल्याने या भागात साचलेल्या पाण्याचा आठ-आठ दिवस निचराच होत नाही. यावर उपाययोजना होण्याची मागणी होत आहे.

Back to top button