पिंपरी : पवना धरण क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम; महापालिका पाणीपुरवठा विभागाची माहिती | पुढारी

पिंपरी : पवना धरण क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम; महापालिका पाणीपुरवठा विभागाची माहिती

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पवना धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने तसेच जून महिना संपून जुलै महिना सुरू झाला, तरी पावसाने दमदार हजेरी न लावल्याने पिंपरी-चिंचवड शहरात पाणी कपात लागू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी आणखी काही दिवस पावसाची प्रतीक्षा केली जाईल, असे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी सोमवारी (दि.4) स्पष्ट केले. पवना धरणात सुमारे 16 टक्के पाणी शिल्लक आहे.

ते पाणी पिंपरी-चिंचवड शहराला महिन्याभर पुरणार आहे. त्यामुळे पुणे पाटबंधारे विभागाने महापालिकेस पाणी काटकसरीने वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याशी मागील आठवड्यात चर्चा केली. त्यात पुढील सात दिवस पावसाची स्थिती लक्षात घेऊन शहरात पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. पवना धरण क्षेत्रात रविवार (दि.3) व सोमवारी (दि.4) पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, तो पाऊस दमदार नसल्याचे सांगितले जात आहे. आणखी काही दिवस जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. धरणात पाणी साठा वाढू लागल्यास कपात केली जाणार नाही. मात्र, साठा न वाढल्यास कपात करावी लागेल, असे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी स्पष्ट केले.

Back to top button