पिंपरी : मुख्य आरोग्य निरीक्षकाचा जातीचा दाखला बोगस | पुढारी

पिंपरी : मुख्य आरोग्य निरीक्षकाचा जातीचा दाखला बोगस

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका मुख्य आरोग्य निरीक्षकाने अनुसूचित जमातीचे बोगस जात प्रमाणपत्र सादर करून महापालिकेची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्या निरीक्षकाची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. सुनील वाटाडे हे त्या निरीक्षकाचे नाव आहे. ते पालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयात मुख्य आरोग्य निरीक्षक म्हणून काम करीत आहेत. वाटाडे यांनी जात प्रमाणपत्र असताना देखील दुसरे जात प्रमाणपत्र काढले.

पुणे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीने जातीचा पहिला दाखला 6 सप्टेंबर 1997 ला अवैध ठरविला आहे. ती बाब महापालिका प्रशासनापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवून पालिकेची गंभीर फसवणूक केली आहे. तसेच, अनुसूचित जातीचे बोगस प्रमाणपत्र सादर केले आहे. तसेच, त्याच्या कामाबाबत अनेक तक्रारी आहेत. या प्रकरणी आरोग्य वैद्यकीय अधिकारी, आरोग्य मुख्य कार्यालय व फ क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्तांकडे शिफारस अहवाल दिला आहे. अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र जप्त व रद्द केल्याची बाब विचारात घेता त्याची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी दिले आहेत. तसेच, 15 दिवसांत दोषारोप ठेवण्याची कार्यवाही करण्याचे आदेश आरोग्य विभागास दिले आहेत.

Back to top button