चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच !! | पुढारी

चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच !!

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, घरफोडींच्या पाच घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल 4 लाख 26 हजारांचा ऐवज चोरून नेला. खराडी, वडगाव शेरी, केसनंद, गोकुळनगर आणि ससाणेनगर या भागांत घरफोड्यांच्या घटना घडल्या.
पहिल्या घटनेत आजारी सासर्‍यांना पाहण्यासाठी कोल्हापूर येथे गेलेल्या विजय बाबूराव शेटे (45, रा. चौधरी वस्ती, खराडी) यांच्या राहत्या घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी 1 लाख 15 हजारांचे सोन्याचे दागिने आणि 25 हजारांची रोकड चोरून नेली

. हा प्रकार 29 जून रोजी सकाळी उघडकीस आला. याबाबत चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्‍या घटनेत जीवन शांताराम भोसले (वय 45, रा. लक्ष्मी एन्क्लेव्ह, शिरीन हॉस्पिटलमागे, सैनिकनगर, वडगांव शेरी) यांचे सासू सासरे काही महिन्यांपासून त्यांच्या मूळ गावी गेले आहेत.

त्यांच्या येरवड्यातील मोहनवाडी येथील घराचा सेफ्टी दरवाजा व मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी 1 लाख 4 हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार शनिवारी पहाटे उघडकीस आला. याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसर्‍या घटनेत डॉ. मिथुन रमेश नाईक (37, रा. सिद्धीविनायक पार्क, पाटील वस्ती, केसनंद, हवेली) यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी 66 हजारांचे दागिने चोरून नेले. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शारदा मोतीचंद भोसले (वय 60, गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड) यांच्या घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप तोडून चोरट्यांनी 89 हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार 1 जुलै रोजी दुपारी साडेबारा ते आठ वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय श्रीकांत अंकुश कदम (वय 36, रा. तोडकर टाऊनशिप, ससाणेनगर, पुणे) यांच्या घरातील 2 लाखांचे दागिने आणि अमेरिकन डॉलर असा 2 लाख अकरा हजारांचा ऐवज, तर वर्धमान टाऊनशिपमधील स्वप्नील तोडकर यांच्या घरातील 27 हजारांचा ऐवज चोरट्यांनी घरफोडी करून नेला. याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button