‘झुंजार’ घेणार नवे रूप ! | पुढारी

‘झुंजार’ घेणार नवे रूप !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड किल्ल्यावर नरवीर तानाजी मालुसरे व किल्लेदार उदयभान रजपूत यांची ज्या झुंजार बुरुजावर लढाई झाली, त्या बुरुजालाच आता मरणकळा येऊ लागल्या आहेत. याचेच भान ठेवून स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानच्या वतीने डागडुजी केली जाणार आहे. या उपक्रमाची सुरुवात स्वच्छता मोहिमेने करण्यात आली. ऐतिहासिक वास्तू, पाणी संवर्धन, वीरगळ संवर्धन, विहिरीचे पुनर्जिवीकरण, प्राचीन अवशेष असलेल्या जागा साफ करून आपल्या इतिहासाचा ठेवा जपण्याचे काम प्रतिष्ठानमधील तरुण करीत आहेत.

याच उपक्रमाचा भाग म्हणून प्रतिष्ठानमधील तरुणांकडून सिंहगडावरील झुंजार बुरुजाची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत प्रतिष्ठानच्या 12 सदस्यांनी सहभाग घेतला. गडावर रविवारी सकाळी लवकर जाऊन प्रतिष्ठानच्या युवकांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. शिवकार्यासाठी लागणारे साहित्य घेऊन देवटाक्यांमधील पाण्याने तहान भागवून झुंजार बुरुजावर मार्गक्रमण केले.

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणा देऊन स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. बुरुजावर वाढलेले आजूबाजूचे गवत काढण्यात आले. तिथे असणार्‍या जमिनीखाली गाडल्या गेलेल्या सर्व पायर्‍या मोकळ्या करण्यात आल्या. माती व दगड यांची विल्हेवाट लावण्यात आली. तब्बल सात तास अथक परिश्रम घेऊन झुंजार बुरुज मोकळा करण्यात आला. या मोहिमेत स्वहित कळंबटे, भारत रेणुसे, अनिल कडू, मंगेश नवघणे, ऋषीकेश साळुंखे, रमेश ढोकळे, सुनील गोरे, अविनाश चोरगे, निखिल चोरगे, स्वप्नील कलंबटे, नीलेश भगत सहभागी झाले होते.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असंख्य किल्ले आहेत. सध्या पाऊस कसाही पडत असल्याने ऐतिहासिक वास्तूला धोका पोहचून माती खाली गाडण्याच्या मार्गावर आहेत. झुंजार बुरुजाचीही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. प्रतिष्ठानच्या वतीने लवकरच या बुरुजाची डागडुजी करून मूळ रूपात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याची सुरुवात स्वच्छता मोहिमेने करण्यात आली. हा उपक्रम दर रविवारी राबविला जाणार आहे.
– मंगेश नवघणे, अध्यक्ष, स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान

Back to top button