पुणे : ‘जीएसटी’च्या निषेधार्थ शुक्रवारी व्यापारी परिषद | पुढारी

पुणे : ‘जीएसटी’च्या निषेधार्थ शुक्रवारी व्यापारी परिषद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जीएसटीच्या निषेधार्थ येत्या शुक्रवारी (दि. 8 ) मार्केट यार्डातील दि पूना मर्चंट्स चेंबरच्या व्यापार भवन सभागृहात राज्यव्यापी व्यापारी परिषद भरविण्यात येणार आहे. अनब—ँडेड खाद्यान्नांवर पाच टक्के वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) आकारण्याचा निर्णय जीएसटीने घेतला आहे. तांदूळ, डाळ, गहू, गव्हाचे पीठ, तृणधान्य, मखाना, राई बार्ली व्होट पेंड, पनीर, दही, लस्सी, ताक, मध, सेंद्रिय खत, नारळ पाणी, आदी वस्तूंवर पाच टक्के जीएसटी आकारण्यात आला आहे.

जीएसटीची आकारणी केल्यास महागाई वाढणार असून, त्याची झळ सामान्यांना बसणार आहे. याबाबत विचारविनिमय करून पुढील निर्णय घेण्यासाठी ही परिषद भरणार आहे, अशी माहिती दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे (फॅम) अध्यक्ष वालचंद संचेती आणि दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली. या बैठकीत चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेड, दि ग्रेन राईस अँड ऑईल सीड्स मर्चंट असोसिएशन आदी संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

Back to top button