पुण्याचे वनक्षेत्र वाढले , वन विभागाचा दावा | पुढारी

पुण्याचे वनक्षेत्र वाढले , वन विभागाचा दावा

सुनील जगताप :  पुणे : पुण्यासह देशात वनक्षेत्रात झपाट्याने घट होत असल्याचे चित्र गेल्या काही दशकांत आढळून आले. त्यामुळे महाराष्ट्रात वृक्षलागवडीची मोहीम राबवीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठिकठिकाणी राबविला जात होता. या वृक्षलागवडीचा चांगला परिणाम पुणे वनविभागांतर्गत आढळून आला आहे.

भारतीय वन सर्वेक्षणाच्या अहवालानुसार तब्बल 5.63 चौरस किलोमीटरने खुल्या वनक्षेत्रात वाढ झाल्याचे समोर आले आहे. पुणे वन विभागामध्ये झपाट्याने होणार्‍या वृक्षतोडीला आळा घालत असतानाच दुसर्‍या बाजूला वृक्षलागवडीची मोहीमही राबविली जात होती. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सलग चार वर्षे 33 कोटी वृक्षलागवडीची मोहीम राज्यात राबविली होती.

पुणे वन विभागाच्या जागेवर करण्यात आलेल्या वृक्षलागवड मोहिमेमध्ये 80 ते 85 टक्के वृक्ष अद्यापही जिवंत असल्याचा दावा विभागाकडून करण्यात आलेला आहे. खुल्या जंगलाचे प्रमाण 2019 मध्ये 949.93 चौ. कि.मी. असल्याचा अहवाल पुणे वन विभागाने दिला होता. दोन वर्षानंतर 2021 मध्ये भारतीय वन सर्वेक्षणाव्दारे जाहीर केलेल्या भारतीय राज्य वन अहवालामध्ये पुणे वन विभागात तब्बल 5.63 चौ. कि. मी. क्षेत्र वाढल्याचे आढळून आले असून 955.5 चौ. कि.मी. वर क्षेत्र पोहचल्याचे निदर्शास आले आहे.

नागरिकांच्या सहभागामुळेच शक्य
पुणे जिल्ह्यामध्ये खुल्या जंगलामध्ये वाढ होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे पुण्यातील पर्यावरण आणि संवेदनशील नागरिक. हे नागरिक स्वतःहून वृक्षारोपण करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. पुण्यात वन विभाग आणि खासगी संस्था सीएसआरच्या माध्यमातून वृक्षलागवडीचा करार करून वृक्ष लागवडीत आघाडीवर आहेत. सीएसआरच्या माध्यमातून तब्बल 1 लाखाहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर वनविभाग व काही संस्था वनसंवर्धनाचे कामही जोमाने करतात.
– राहुल पाटील, उपवनसंरक्षक, पुणे वनविभाग

पुणे जिल्ह्याचा पाचवा क्रमांक
भारतीय वन सर्वेक्षणाच्या 2021 च्या अहवालानुसार राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याचा वनक्षेत्र वाढीमध्ये पाचवा क्रमांक आहे. इस्ट कव्हरसाठी नववा तर राज्यातील एकूण वनक्षेत्रात 11 वा क्रमांक असल्याचे निदर्शनास आले आहे.

Back to top button