पुणे : नाणे-दार्‍या घाट ‘हाऊसफुल्ल’ | पुढारी

पुणे : नाणे-दार्‍या घाट ‘हाऊसफुल्ल’

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या महिन्यात जुन्नर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला. पावसाने सह्याद्रीच्या रांगेत वसलेला व ऐतिहासिक वारसा लाभलेला नाणे घाट आणि दार्‍या घाट परिसरात पर्यटकांनी रविवारी (दि. 3) मोठी गर्दी केली होती.

सध्या येथे ऊन-पावसाचा खेळ सुरू असून, परिसर धुक्याने वेढलेला आहे. दोन प्रमुख पर्यटनस्थळांसह माळशेज घाट, किल्ले शिवनेरी, लेण्याद्री-ओझर, माणिकडोह-पिंपळगावजोगा-चिल्हेवाडी या धरणांचा परिसर, तसेच विविध पुरातन लेण्या पाहण्यासाठी पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक आदी भागांतून हजारो पर्यटक जुन्नर तालुक्यात येत आहेत.

घाटघर गावाजवळील ब्रिटिशकालीन फडतरे बंधार्‍याच्या भिंतीची उंची वाढविल्यामुळे, तसेच येथे भुशी डॅमच्या धर्तीवर पायर्‍या केल्यामुळे येथील बंधार्‍यावरून वाहणार्‍या पाण्याची मजा घेण्यासाठी पर्यटक येत आहेत. रोटरी क्लबने या बंधार्‍यातील गाळ काढल्यावर अधिक पाणीसंचय होण्यासाठी शासनाने या भिंतीची उंची वाढविली. त्यामुळे हा नव्याने उपलब्ध झालेला फडके धबधबा, नाणे घाट परिसरातील रिव्हर्स धबधबा, घाटघर येथील चुलांघन धबधबा, पुष्कर धबधबा आदी ठिकाणचे पांढरे शुभ्र धबधबे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. यासोबतच हातवीज पठार, दुर्गावाडी, कोकणकडा आदी ठिकाणीही पर्यटक गर्दी करीत आहेत. त्यामुळे येथील हॉटेल्स, ढाबे, टपर्‍या, होम स्टे, घरगुती जेवण बनवून देणार्‍यांना रोजगार मिळत आहे.

नाणे घाटात जाताना लागणार टोल

नाणे घाट, जीवधन किल्ला व परिसरात जाताना आता पर्यटकांना उपद्रव शुल्क द्यावा लागणार आहे. परिसरातील जैवविविधता जपणे, परिसर प्लॅस्टिकमुक्त ठेवणे, मद्यपी व हुल्लडबाजांना रोखणे तसेच स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देणे, या उद्देशातून घाटघर संयुक्त वन व्यवस्थापन समिती व वन विभागाने हा टोल रविवारपासून (दि. 3) सुरू केला आहे.

Back to top button