पुणे : विद्यापीठ घेणार विशेष परीक्षा, परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना संधी | पुढारी

पुणे : विद्यापीठ घेणार विशेष परीक्षा, परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना संधी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अंतिम सत्राची, अंतिम वर्षाची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने सुरू आहे. परंतु, या परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची एक संधी मिळणार आहे. त्यासाठी विद्यापीठ विशेष परीक्षा घेणार आहे. असल्याची माहिती विद्यापीठातील अधिकार्‍यांनी दिली.

विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार परीक्षेच्या कालावधीमध्ये जे विद्यार्थी आंतरविद्यापीठीय, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा अथवा इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी होणारे किंवा झालेले असतील, तसेच राष्ट्रीय सेवायोजना व राष्ट्रीय छात्रसेना योजना यामध्ये सहभागी होणारे किंवा झालेले असतील, अशा पात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे.

तसेच, इंद्रधनुष्य, अश्वमेघ, आविष्कार अशा विविध स्पर्धा, तसेच केंद्र शासन व राज्य शासन यांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणारे, झालेले विद्यार्थी, तसेच समकक्ष विषय व इतर कारणांमुळे एकाच दिवशी एकाच वेळेस दोन विषयांची परीक्षा येत असल्यास, केंद्रीय प्रवेशप्रक्रिया, राष्ट्रीय पात्रता चाचणी, राज्यस्तरीय पात्रता चाचणी इत्यादी तत्सम परीक्षा व विद्यापीठ परीक्षा एकाच दिवशी येत असल्यास अशा विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार आहे.

संबंधित विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज महाविद्यालयात सर्व कागदपत्रांसह जमा करावेत. महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सध्या सुरू असलेली परीक्षा संपल्यानंतर दहा दिवसांच्या आत न चुकता सर्व प्रस्ताव परीक्षा विभागास सादर करावेत, अशा सूचना परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिल्या आहेत.

महत्त्वाच्या कारणांमुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहून त्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी विद्यापीठाने विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. पात्र विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन अर्ज करावेत, ज्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही.
– डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

Back to top button