पुणे : माळशेज घाटात धुक्याची दाटी | पुढारी

पुणे : माळशेज घाटात धुक्याची दाटी

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : नयनरम्य माळशेज घाटात अनेक दिवसांपासून दाट धुक्याने दाटी केली आहे. धुक्याची दुलई पांघरलेला घाट पाहण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र, यंदा पुरेशा पावसाअभावी येथील धबधबे अद्यापही कोरडेठाक असल्याने निराशा होत आहे.

हजारो फूट खोल दर्‍या, हजारो फूट उंच काळ्या पाषाणाचे डोंगरकडे, अवतीभोवती सर्वत्र हिरव्यागार डोंगरांची रांग, नजर पोहोचणार नाही इतकी कडेकपारीतील नयनरम्य हिरवीगार दाट झाडी, कपारीत विसावलेले पवित्र महादेवाचे मंदिर व देवालयातील घंटेचा सातत्याने होणारा मंजूळ निनाद, विविध प्राणी व पक्ष्यांचा किलबिलाट, मक्याचे कणीस, कंदमुळे, जंगली पालेभाजी, रानमेवा विक्री करणारी आदिवासी महिला व चिमुरडी मुले, असे बरेच काही डोळ्यात साठवण्यासारखे असल्याने माळशेज घाटातील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, येथील धबधबे सुरू होण्यासाठी पर्यटकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

दिवसाही हेडलाइट लावूनच प्रवास

थंड हवामान, मोठ्या प्रमाणात धुके व अल्प प्रमाणात पाऊस, यामुळे डोंगरदर्‍या हिरवाईने नटलेल्या आहेत. पावसाळी वातावरणामुळे अवघ्या राज्यभरातून पर्यटक माळशेज घाटाला पसंती देत असतात. यंदाही दाट धुक्यामुळे पर्यटकांचे लोंढे आकर्षित होऊ लागले आहेत. दाट धुके असल्याने वाहनचालकांना दिवसाही हेडलाइट लावूनच प्रवास करावा लागत आहे.

Back to top button