पिंपरी : महापालिकेतील अधिकारी, कर्मचार्‍यांना गणवेश सक्ती | पुढारी

पिंपरी : महापालिकेतील अधिकारी, कर्मचार्‍यांना गणवेश सक्ती

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना गुजरात राज्यातील सुरत महापालिकेप्रमाणे विशिष्ट गणवेश दिला जाणार आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांना शिस्त लागणार असून, दैनंदिन कामकाजास गती येणार आहे. गणवेशावरून कर्मचारी कोणत्या विभागाचा आहे, हे स्पष्ट होणार आहे, असे प्रशासनाचे मत आहे.

महापालिकेचे वर्ग 1 ते 4 मध्ये सुमारे 8 हजार अधिकारी व कर्मचारी आहेत. अधिकारी व कर्मचारी कोणत्या विभागाचे आहेत. हे गणवेशावरून स्पष्ट होत नाही. विभाग आणि अ,ब,क,ड असा वर्गानुसार अधिकारी व कर्मचार्‍यांचे गणवेश असावेत, असे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांचे मत आहे. त्या अंतर्गत अधिकारी व कर्मचार्‍यांचे ओळखपत्र (आयकार्ड) एकसमान बनविण्यात आले आहेत. वर्गवारीनुसार ओळखपत्राच्या फितीचा रंग लाल, निळा, पिवळा, हिरवा, काळा, पांढरा असे वेगवेगळा ठेवण्यात आला आहे. ओळखपत्र दिसेल, अशा तर्‍हेने बाळगणे अधिकारी व कर्मचार्‍यांना सक्तीचे केले आहे.

त्यामुळे बहुतांश अधिकारी व कर्मचारी ओळखपत्रासह वावरताना दृष्टीस पडत आहेत. अधिकारी व कर्मचारी यांचे गणवेश कसा असावा, त्यांची रंगरंगती कशी असावी, तसेच, महिला अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी सोईस्कर ठरणारा गणवेश कसा असावा, हे पाहण्यासाठी अधिकार्‍यांचे एक शिष्टमंडळ नुकतेच सुरत महापालिकेचा दौरा करून आले आहे.

त्यामध्ये उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी संघाच्या पदाधिकार्‍यांचा समावेश होता. दरम्यान, तत्कालिन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना गणवेश सक्ती केली होती. त्यांची बदली झाल्यानंतर गणवेश वापरणे जवळजवळ बंद झाले. केवळ शिपाई तसेच, आरोग्य विभागाचे कर्मचारी ठराविक गणवेश परिधान करीत असल्याचे दिसत आहे.

गणवेशामुळे अधिकारी-कर्मचारी ओळखता येणार
शिष्टमंडळाच्या अहवाल लवकरच आयुक्त पाटील यांच्यासमोर सादर केला जाणार आहे. त्यानुसार अ, ब, क आणि ड वर्गानुसार व विभागानुसार अधिकारी व कर्मचार्‍यांचा गणवेश निश्चित केला जाणार आहे. त्या गणवेशातच अधिकारी व कर्मचार्‍यांना कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे कामाची शिस्त वाढून दैनंदिन कामकाजास गती येणार आहे. कोणत्या विभागाचे अधिकारी व कर्मचारी आहेत ते ओळखणे सुलभ होणार असल्याचा दावा प्रशासन करीत आहे.

आयुक्तांसमोर लवकरच अहवाल सादर करणार
सुरतचा दौरा केला आहे. त्या शहराची लोकसंख्या 70 लाख असून, महापालिकेत 26 हजार अधिकारी व कर्मचारी आहेत. अधिकारी व कर्मचार्‍यांना सर्वांना गणवेश आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना गणवेश असावा, असे नियोजन आहे. अहवाल लवकरच आयुक्तांकडे सादर केला जाईल, असे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी सांगितले.

Back to top button