सावकारी प्रकरण : दोन लाखांच्या बदल्यात उकळले दहा लाख | पुढारी

सावकारी प्रकरण : दोन लाखांच्या बदल्यात उकळले दहा लाख

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामतीमध्‍ये वारंवार सावकारी प्रकरण घडत आहेत. एका व्यक्तीने २०१५ मध्‍ये तीन टक्के व्याजाने दोन लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात १० लाख रुपये दिले. तरीही व्याजाने पैसे घेतेवेळी नावावर करून दिलेली जमीन परत करण्यास नकार देणाऱ्या अनिल तुळशीराम पवार (रा. राजुरी, ता. फलटण, जि. सातारा) या सावकाराविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बारामती सावकारी प्रकरण वैशाली अनिल साळुंखे (रा. तांदूळवाडी रोड, बारामती) या महिलेने याबाबत फिर्याद दिली. ऑक्टोबर २०१५ मध्ये त्यांना प्रापंचिक अडचणींसाठी २ लाखांची गरज होती. त्यामुळे त्यांचे मूळ गाव असलेल्या राजुरी येथील अनिल पवार यांच्याकडून ३ टक्के व्याजाने २ लाख रुपये घेण्यात आले.

त्या बदल्यात पवार याने फिर्यादीची ढाकाळे (ता. बारामती) येथील ८५ आर शेतजमीन पाच वर्षांच्या मुदतीसाठी घेतली. पैसे परत केल्यावर जमीन परत करण्याचे आश्वासन त्याने दिले होते. दस्त करतेवेळीच दस्ताच्या खर्चापोटी २० हजार रुपये काढून घेत पवार याने फिर्यादीला ८० हजार रुपये दिले.

त्यानंतर  राणी पवार यांच्‍या खात्यावरून फिर्यादीचे पती अनिल यांच्या खात्यावर ९० हजार रुपये पाठवले. तसेच मध्यंतरी दहा हजार रुपये रोख स्वरुपात असे १ लाख ८० हजार रुपये देण्यात आले.

घरदार पणाला लावले

दरम्यान फिर्यादीने बारामतीत बुकींग केलेला फ्लॅट रद्द केल्यावर त्याचे मिळालेले अडीच लाख, जळोची येथील प्लॉट विकून त्याचे आलेले ४ लाख रुपये व राजुरी येथील पतीच्या नावे असलेली जमीन विकल्यानंतर ३ लाख रुपये पवार यांना दिले.

याशिवाय किरकोळ स्वरुपात अन्य रक्कम असे एकूण १० लाख रुपये ५ एप्रिल २०२० पर्यंत देण्यात आले. त्यानंतर जमीन परत करण्यासाठी पाठपुरावा केला असता आणखी पाच लाख रुपये व्याज द्यावे लागेल, असे सांगत त्याने टाळाटाळ केली.

अखेर सावकाराच्या जाचाला कंटाळून फिर्यादीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

हेही वाचलं का ?

Back to top button