गंगाधाम चौकात मैलापाणी रस्त्यावर | पुढारी

गंगाधाम चौकात मैलापाणी रस्त्यावर

बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा: मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौकात मैलापाण्याच्या चेंबरवरच बांधलेले सार्वजनिक शौचालय तोडल्याने साचलेला मैला रस्त्यावर पसरून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकातील मुख्य रस्त्यावर तत्कालीन नगरसेवकांनी सुमारे दहा लाख रुपये खर्च करून सार्वजनिक शौचालय बांधले होते. काही दिवसांपूर्वी हे शौचालय तोडण्यात आले. तोडलेल्या शौचालयाच्या खालीच पुणे महानगरपालिकेने बांधलेल्या मलवाहिनीचे चेंबर होते.

हे शौचालय तोडल्याने हे चेंबर प्रचंड वेगाने ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. त्यातून मैलापाणी रस्त्यावर पसरून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटलेली आहे. बांधकाम व्यावसायिकांनी मनपा अधिकारी व नगरसेवक यांना हाताशी धरून हे शौचालय काढले व चेंबर उघडा पडला आहे,’ असे मत सामाजिक कार्यकर्ते सतीश तावरे यांनी सांगतिले.

या ठिकाणचे चेंबरमधून मोठ्या प्रमाणात गाळ आणि मैलापाणी वाहत आहे, हे निदर्शनास आले आहे. मी इतक्यातच या प्रभागात प्रभारी अधिकारी म्हणून आलो असून, लवकरात लवकर येथील प्रश्न सोडवला जाईल.

       – अनिल सोनवणे, प्रभारी सहायक आयुक्त, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय पुणे .

Back to top button