रात्रशाळांमध्ये पुन्हा अर्धवेळ शिक्षक; कालावधी अडीच तासांचा केल्याने अडचणींत भर | पुढारी

रात्रशाळांमध्ये पुन्हा अर्धवेळ शिक्षक; कालावधी अडीच तासांचा केल्याने अडचणींत भर

पुणे : पुढारी वृत्तसेवा: रात्रशाळांमध्ये पूर्णवेळऐवजी पुन्हा अर्धवेळ शिक्षकांची नेमणूक करण्याचा; तसेच रात्रशाळेचा कालावधी अडीच तासांचा करण्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. शिक्षण विभागाने हा निर्णय जाहीर करताना 17 मे 2017 रोजीचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे राज्यभरातील रात्रशाळांच्या अडचणींत भर पडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यात 176 रात्रशाळा असून, मुंबईत 150 हून अधिक रात्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालये आहेत. पुरेसे शिक्षक नसल्यामुळे बहुतांश रात्रशाळांमध्ये अध्यापनाचे काम सुरळीत झाले नाही, असे स्पष्ट करीत जुना निर्णय रद्द केला.

दिवस शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन रात्रशाळेत होऊ शकत नाही; तसेच अर्धवेळ अध्यापन करणार्‍या शिक्षकांना पूर्णकालीन शिक्षकांचे वेतन देणे कायद्याने शक्य नाही. त्यामुळे 17 मेच्या निर्णयापूर्वी नियमानुसार कार्यरत असलेल्या शिक्षकांना नेमणुका देण्यात येतील. रात्रशाळेत किमान विद्यार्थी संख्या आवश्यक राहणार असून, त्यावर संचमान्यता; तसेच अर्धवेळ शिक्षक संख्या निश्चित करण्यात येणार आहे. या रिक्त जागांवर नवीन दुबार शिक्षक नेमताना दिवस शाळेतील नियमित शिक्षकाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे, असे नव्या निर्णयात स्पष्ट केले आहे.

  • रात्रशाळेतील शिक्षक-कर्मचार्‍यांच्या प्रमुख मागण्या
  • प्रत्येक शाळेला मुख्याध्यापक पद मिळावे.
  • रात्रशाळांमध्ये कार्यरत शिक्षकांची कार्यभार निश्चिती (गणना) करावी.
  • रात्रशाळेतील शिक्षक-कर्मचार्‍यांची 2 अर्धवेळ वर्षांची सेवा 1 वर्ष पूर्णवेळ गृहीत धरून शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणी, तर कर्मचार्‍यांना आश्वासित प्रगती योजनेचे लाभ मिळावेत.
  • रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मोफत मिळावीत.

रात्रशाळांमध्ये अर्धवेळ (दुबार) शिक्षक असताना दहावीच्या मार्च 2017 चा निकाल 60.88 टक्के लागला होता. त्याच रात्रशाळांचा पूर्णवेळ कार्यरत शिक्षकांच्या काळात दहावीच्या मार्च 2020 परीक्षेचा निकाल 80.08 टक्के लागला. त्यामुळे पुन्हा अर्धवेळ शिक्षण नेमण्याचा निर्णय चुकीचा आहे.

                                                           – प्रा. अविनाश ताकवले, माजी प्राचार्य

Back to top button