वाहतूक कोंडी सुटणार नाही; बालभारती- पौड रस्त्याबाबत चर्चासत्रातील मत | पुढारी

वाहतूक कोंडी सुटणार नाही; बालभारती- पौड रस्त्याबाबत चर्चासत्रातील मत

पुणे : पुढारी वृत्तसेवा: ‘बालभारती-पौड रस्त्यामुळे वाहतूक कोंडी सुटणे शक्य नाही. डोगरातून रस्ता काढल्यास पर्यावरणाची हानी होईल,’ असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. सजग नागरिक मंचच्या वतीने बालभारती-पौड दरम्यानचा रस्ता पुणेकरांच्या हितास ‘तारक की मारक’ या विषयावर चर्चासत्राचे रविवारी सायंकाळी आयोजन केले होते. याप्रसंगी उपस्थित विविध तज्ज्ञांनी आपली मते व्यक्त केली. याप्रसंगी डेक्कन जिमखाना परिसर समितीच्या डॉ. सुषमा दाते, एसपीटीएम संस्थेचे हर्षद अभ्यंकर, माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी उपस्थित होते.

‘बालभारती येथील डोंगरातून रस्ता काढल्यास त्याचा फायदा फक्त कोथरूड भागातील लोकांनाच होणार आहे. इतर ठिकाणी जाणार्‍या वाहनांना लॉ कॉलेज रस्त्याचाच वापर करावा लागणार आहे. त्यामुळे येथील कोंडी अजिबातच सुटणार नाही. याउलट येथील टेकडीवरील पर्यावरणाची मोठी हानी होईल, वन्य प्राण्यांचा अधिवास कायमचा संपेल,’ असे तज्ज्ञांनी सांगितले डॉ. दाते म्हणाल्या, ‘बालभारती पौड प्रस्तावित रस्त्यामुळे लॉ कॉलेज रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल. वाहन चालकांचे अंतर कमी होईल, असे सांगितले जात आहे. याबाबत महापालिकेने अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालाचा अभ्यास करण्यात आला.

त्यावेळी बालभारती पौड प्रस्तावित रस्त्यामुळे फक्त 100 ते 500 मीटरचा फरक पडणार आहे. तसेच, या रस्त्यामुळे दीड हजार झाडे तोडली जाणार आहेत. तसेच, त्याचा प्रदूषण आणि भूजल पातळीवरदेखील परिणाम होणार आहे.’ अभ्यंकर म्हणाले, ‘महापालिकेने नेमलेल्या संस्थेने सेनापती बापट (एसबी) रस्त्यावरून येणार्‍या वाहनांचा अभ्यास केला. त्यावेळी या रस्त्यावरून येणारी बहुतांश वाहने ही बीएमसीसी, भांडारकर, प्रभात रस्त्यावरून जात असल्याचे दिसून येत आहेत. पौड फाट्याकडे येणार्‍या वाहनांची संख्या खूपच कमी असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. त्यामुळे हा रस्ता खरोखरच गरजेचा आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.’

पीएमपीची सेवा 20 वर्षांपासून नाही
‘रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची गरज आहे, पण लॉ कॉलेज रस्त्यावर वीस वर्षांपासून पीएमपीची सेवा नाही. इतर सुविधा उपलब्ध न करता फक्त बालभारती पौड रस्ता करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. हे चुकीचे आहे,’ असे अभ्यंकर यावेळी म्हणाले.

विकासाच्या बाजूनेही उभे राहा
केसकर म्हणाले, ‘पहिल्यापासून मी रस्त्याच्या बाजूने आहे. लॉ कॉलेज रस्त्यावरून दिवसाला 57 हजार वाहने जातात. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान न करता या रस्त्याला पर्याय देता आला पाहिजे, अशी पहिल्यापासून माझी भूमिका आहे. पुणेकरांनी विकासाच्या बाजूनेही उभे राहिले पाहिजे.’

Back to top button