दापोडी : पवना नदीत जलपर्णीचे साम्राज्य | पुढारी

दापोडी : पवना नदीत जलपर्णीचे साम्राज्य

दापोडी : जुनी सांगवी, दापोडी परिसरात डासांचे साम्राज्य वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मुळा व पवना नदीच्या पात्रात स्वच्छतेचा अभाव असल्याने नदीपात्रामध्ये घाणीचे आणि जलपर्णीचे साम्राज्य वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दापोडी व पिंपळे गुरव या पुलाखाली पवना नदीमध्ये बर्‍याच दिवसांपासून जलपर्णी साचून राहिली आहे.

त्यामुळे पाणी वाहण्यास अडथळा निर्माण झाला आहे. तसेच, जलपर्णीमध्ये दुर्गंधीयुक्त कचराही मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे. त्यामुळे मच्छरांचा उपद्रव वाढला आहे. शहरामध्ये जोरदार पाऊस झाला नसल्याने जलपर्णीचे प्रमाण वाढत आहे. सध्यस्थितीत नदीपात्रात जलपर्णी चांगलीच वाढली असल्याचे दिसत होत आहे.

जलपर्णीमुळे डासांसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी डास चावा काढत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेकडून वर्षभर जलपर्णी काढण्याचे कंत्राट दिले जाते. कंत्राट घेऊन फक्त जलपर्णी काढण्याचा दिखावा केला जातो. या कामामध्ये लाखो रुपये लाटण्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. त्यामुळे संबधित प्रशासनाने त्वरित लक्ष घालून नदीपात्रातून जलपर्णी काढण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

महापालिकेकडून जलपर्णी काढण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. जून महिन्यापासून शहरातील जलपर्णी काढण्यात आली नाही, या गोष्टीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. नदीच्या दोन्ही पात्रालगत जलपर्णी साचलेली आहे. ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
– राजू सावळे, पर्यावरणप्रेमी, जुनी सांगवी

Back to top button