पैसे मागितल्याने पिस्तूल दाखवून धमकी; तीन जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

पैसे मागितल्याने पिस्तूल दाखवून धमकी; तीन जणांवर गुन्हा दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा: भागीदारीमध्ये सुरू केलेल्या व्यवहारातील पैसे मागितल्याच्या रागातून पिस्तूलचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जयंतीलाल ताराचंद ओसवाल, प्रवीण ताराचंद ओसवाल आणि राकेश ताराचंद ओसवाल (सर्व रा. मुकुंदनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज हिम्मतलाल शहा (वय 52, रा. हाईड पार्क, मार्केट यार्ड) यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार न्यू टिंबर मार्केट व गंगाधाम येथे 2006 ते मार्च 2020 दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांनी मिळून घोरपडी मुंढवा येथील सर्व्हे नं. 38, हिस्सा नं. 5/बी घोरपडी येथील जागेसाठी भागीदारी स्वरूपात व्यवहार केला होता. आरोपींनी फिर्यादीकडून 45 लाख रुपये 30 टक्के भागीदारी स्वरूपात घेतले. 2018 मध्ये वरील व्यवहारातील अंदाजे 33 गुंठे जागा 20 कोटी 50 लाख रुपयांना विकली. ठरल्याप्रमाणे फिर्यादी यांना 30 टक्के भागीदारीप्रमाणे 6 कोटी 15 लाख रुपये देणे आवश्यक होते. त्याऐवजी 4.87 टक्केप्रमाणे रजिस्ट्रेशन करून फक्त 1 कोटी रुपये दिले.

इतरही व्यवहारामध्ये ठरल्याप्रमाणे सर्व मिळून 17 कोटी 20 लाख 12 हजार 750 रुपये न देता फिर्यादीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादी मनोज शहा यांनी वारंवार विचारणा केली असताना “मी तुला पैसे देत नाही,” असे सांगितले. मार्च 2020 मध्ये जयंतीलाल ओसवाल हे शहा यांच्या ऑफिसजवळून जात असताना त्यांनी पुन्हा पैशांबाबत विनवणी केली. तेव्हा त्यांनी फिर्यादी यांना गाडीमध्ये बसवले. त्यांच्याजवळील पिस्तूल दाखवून ‘परत पैसे मागितले तर, जिवे मारून टाकीन’, अशी धमकी दिल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने मनोज शहा घाबरून गेले होते. त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रारअर्ज केला होता.

Back to top button