पिंपरी : काळजी घ्या ! कोरोनाचे 3 दिवसांत 599 बाधित रुग्ण | पुढारी

पिंपरी : काळजी घ्या ! कोरोनाचे 3 दिवसांत 599 बाधित रुग्ण

पिंपरी :  पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचे गेल्या तीन दिवसांत एकूण 599 बाधित रुग्ण आढळले आहेत. म्हणजे, दिवसाला सरासरी 200 बाधित रुग्णांची नोंद होत आहे. मे महिन्यात केवळ 299 बाधित रुग्ण आढळले होते. म्हणजे, दिवसाला सरासरी केवळ 10 रुग्णांची नोंद होत होती. जून महिन्यापासून या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या सध्या वाढू लागली आहे. सध्या दिवसाला सरासरी 200 बाधित रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये 599 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे ती धोक्याची घंटा ठरु शकते. रविवारी दिवसभरात 208 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 138 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या शहरातील रुग्णालयांमध्ये 48 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे.

तर, 1149 रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार केले जात आहे. दिवसभरात 743 संशयित रुग्णांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. शहरामध्ये मे महिन्यात कोरोना बाधितांची रुग्णसंख्या नियंत्रणात होती. दररोज बाधित होणार्‍या रुग्णांचे प्रमाण सरासरी 10 इतके होते. त्यामुळे मे महिन्यात केवळ 299 बाधित रुग्णांची नोंद झाली. जून महिन्यात बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या महिन्यात दिवसाला सरासरी 77 बाधित रुग्णांची नोंद होत होती. महिनाभरात 2 हजार 323 रुग्ण आढळले. तर, जुलैत पहिल्या तीन दिवसांतच 599 बाधित रुग्णांची नोंद झाली. म्हणजे, दिवसाला सरासरी 200 बाधित रुग्ण आढळत आहेत.

महिना बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण कोरोना चाचण्या
मे  299  300  13347
जून  2323  1363  14918
1 ते 3 जुलै  599  427  2036

Back to top button