वाल्हे परिसरात थंडी-तापाचे रुग्ण | पुढारी

वाल्हे परिसरात थंडी-तापाचे रुग्ण

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा; मागील आठवड्यापासून, वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. तो आरोग्यासाठी अपायकारक ठरत आहे. तसेच, नुकताच संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळा यामुळे व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान, वाल्हे परिसरात उन्हाळ्यासारखे कडक ऊन पडत असून, मध्येच पावसाची रिमझिम सुरू आहे. दिवसभर गरमाई, तर सायंकाळी थंडगार वारा यामुळे वाल्हे परिसरात मोठ्या प्रमाणावर थंडी-तापाचे रुग्ण आढळत आहे. सध्या घरटी एका तरी रुग्णास सर्दी किंवा तापाची लक्षणे आढळून येत आहेत. दरम्यान, वाल्हे व परिसरातील गावामध्ये मोठ्या प्रमाणावर थंडी, ताप, सर्दी, खोकला आदी आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व खासगी रुग्णालयांत रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाल्हे मुक्कामी येण्याआधी वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडी रुग्ण संख्या 15 – 20 आसपास होती. तसेच खासगी रुग्णालयातीलही याच दरम्यान होती. मात्र, पालखी सोहळा पुढे मार्गस्थ होताच मंगळवार (दि. 28) प्राथमिक आरोग्य केंद्रातील, खासगी रुग्णालयातील रुग्णसंख्या वाढीस सुरुवात झाली. वाल्हे परिसरातील खासगी रुग्णालयातील ओपीडी रुग्णसंख्येतही लक्षणीय वाढ होत असून, मागील आठवड्यात दहा-पंधरा रुग्णसंख्या होत असलेल्या रुग्णालय दिवसभर 80- 85 होत असल्याची माहिती डॉ. किरण बालगुडे यांनी दिली. वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णसंख्या वाढत असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पर्यवेक्षिका संजीवनी दरे यांनी दिली.

‘पालखीनंतर वाल्हे (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीने गावातील, तसेच पालखी महामार्ग परिसरातील व पालखी मैदानातील कचरा उचलून तो नष्ट केला असून, वारकर्‍यांनी शिल्लक अन्न उघड्यावर ओतले होते. त्या अन्नावरही औषध टाकले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर स्वच्छता केली होती; तसेच डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धूर फावारणी करण्यात येणार आहे, असे सरपंच अमोल खवले यांनी सांगितले.

Back to top button