पुण्याला आमदारकी? मुख्यमंत्री शिंदे गटाकडून विधानपरिषदेच्या माध्यमातून संधीची शक्यता | पुढारी

पुण्याला आमदारकी? मुख्यमंत्री शिंदे गटाकडून विधानपरिषदेच्या माध्यमातून संधीची शक्यता

पुणे : पुढारी वृतसेवा: राज्यात सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या माध्यमातून पुण्यालाही विधानपरिषदेत संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी काही जागा शिंदे गटाला मिळणार असून, त्यामध्ये पुण्यातील शिंदेसमर्थकांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकीसाठी ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेतून बंडखोरी करून भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद मिळविले. सेनेचे तब्बल 39 आमदार त्यांच्यासमवेत आहेत.

त्यात राज्यभरातील जवळपास प्रत्येक विभागातील आमदारांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, पुणे शहर आणि जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार सद्य:स्थितीला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी पुण्यातील सेनेची ताकद किती, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, असे असले तरी शिंदे यांना मानणारे काही मातब्बर माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुण्यात असून, अद्याप त्यांनी थेट भूमिका घेतलेली नाही. असे असले तरी या समर्थकांना आगामी काळात मुख्यमंत्रिपदाच्या माध्यमातून अधिक ताकद देण्याचे काम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्रिपदी शपथ घेतल्यानंतर लगेचच अवघ्या तिसर्‍या दिवशी हडपसर भागातील शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी प्रभागातील रखडलेल्या कामांसाठी निधीसाठी थेट मुख्यमंत्र्यांना संपर्क केला. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना सूचना केल्या आणि अवघ्या तासाभरात प्रत्येक प्रभागासाठी एक कोटी रुपये खर्चाचा निर्णय घेतला. त्यामुळे मुख्यमंत्री आता स्वतःची फळी उभारण्यासाठी ताकद लावणार, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच आता विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी नव्या सरकारकडून नव्याने जी यादी पाठविली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, त्यात पुणे शहराला मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातून संधी दिली जाईल, अशी शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली.

त्यासाठी शिंदे यांच्याशी गेल्या अनेक वर्षांपासून जवळचे संबंध असलेले हडपसरचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांचे नाव आघाडीवर आहे. भानगिरे यांनी त्यांच्या कार्यकाळात एकनाथ शिंदे या नावाने उद्यान उभारले आहे. राज्यातील राजकीय घडामोडींच्या काळात ते शिंदे यांच्या संपर्कात होते. त्यामुळे मुख्यमंर्त्यांबरोबर असलेल्या या जुन्या ऋणानुबंधामुळे त्यांना विधानपरिषदेवर संधी मिळू शकते, अशी चर्चा आता शहरात सुरू झाली आहे. तसे झाल्यास त्याचा थेट फायदा आगामी महापालिका निवडणुकीत आणि त्यापुढे शिरूर लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला आणि त्यांच्या समर्थकांना होऊ शकतो. याबाबत भानगिरे यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. दरम्यान, याशिवाय जिल्ह्यातून माजी मंत्री विजय शिवतारे यांनीही थेट मुख्यमंत्र्यांना समर्थन जाहीर केले आहे. शिवतारे यांचेही नाव त्यासाठी चर्चेत आहे. त्यामुळे आता खरोखरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्याला विधानपरिषदेवर संधी देणार का? हे पाहणे महत्त्वाचे
ठरणार आहे.

Back to top button