पीएमपीने ‘हद्द’ सोडली! शहराबाहेर धावतात तब्बल 400 बस; पुणेकरांना फटका | पुढारी

पीएमपीने ‘हद्द’ सोडली! शहराबाहेर धावतात तब्बल 400 बस; पुणेकरांना फटका

प्रसाद जगताप, पुणे : पुणे-पिंपरी महापालिकांच्या हद्दीतील नागरिकांना सार्वजनिक बससेवा देण्याची जबाबदारी असलेल्या पीएमपीकडे आधीच अपुर्‍या बसगाड्या असताना या शहरांच्या हद्दीबाहेर तब्बल 400 गाड्या सोडण्यात येत आहेत. परिणामी, पुणे-पिंपरीकरांच्या वाट्याला येते तासन्तास ताटकळत राहण्याची वेळ अन् नाइलाज म्हणून मग हजारो रुपयांच्या बाईक घेण्याची शिक्षा. सर्वंकष वाहतूक आराखड्यातील दर एक लाख लोकसंख्येमागे 55 बसगाड्या, या सूत्रानुसार पुणे आणि पिंपरीसाठी सध्याच्या घडीला साडेतीन हजार पीएमपीच्या गाड्यांची आवश्यकता आहे. स्वत:च्या आणि भाडेतत्त्वावरील गाड्या मिळून पीएमपीकडे कशाबशा दोन हजार गाड्या आहेत. म्हणजेच, आधीच पीएमपीला दीड हजार गाड्या कमी पडत आहेत.

मात्र या दोन हजार गाड्याही पुणे-पिंपरीकरांसाठी वापरण्यात येत नसल्याचे दिसून येते. त्यातील तब्बल 400 गाड्या या शहरांच्या हद्दीबाहेरच्या मार्गावर सोडल्या जात आहेत. त्यामुळे पुणेकरांना गाड्यांची कमतरता भासत आहे. अपुर्‍या गाड्यांमुळे पीएमपीची सेवा बेभरवशाची झाली असून वेळेत कामाला जाण्यासाठी पीएमपीचा वापर करणे पुणेकरांकडून टाळले जात आहे. तासन्तास बस थांब्यावर उभे राहण्यापेक्षा नाईलाजाने न परवडणारे कर्ज काढून हजारो रुपयांच्या बाईकची खरेदी करावी लागत आहे. या खासगी वाहनांची संख्या 32 लाखांवर गेल्याने शहरवासीयांना वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाला सामोरे जावे लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संचलन तुटीत वाढ
पुणे महानगरपालिकेकडून पीएमपीला दरवर्षी संचलन तूट म्हणून काही रक्कम दिली जाते. मात्र, दरवर्षी या संचलन तुटीत वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कारण, पीएमपी पुणे शहराबाहेर सर्रासपणे आपली सेवा वाढवत आहे. त्यामुळे पुणे शहराबाहेर गेल्यामुळे गाड्यांचा इंधनावरील खर्च वाढत आहे. तसेच, दुरुस्तीसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. या कारणांमुळे पीएमपीच्या संचलन तुटीमध्ये वाढ होत असून, पीएमआरडीएकडून कोणतीही संचलन तूट म्हणून आर्थिक मदत दिली जात नाही.

ग्रामीण हद्दीतील पीएमपीचे मार्ग
अक्र. मार्ग सुरू असलेली पूर्वीची
बससंख्या बससंख्या
हडपसर-जेजुरी 01 12
हडपसर-मोरगाव 01 05
सासवड-निरा 01 03
सासवड-वीरगाव 01 03
यवत-सुपेगाव 01 02
भोसरी-जुन्नर 01 03
भोसरी-मंचर 01 12
मंचर-घोडेगाव 01 02
यवत-कुरकुंभ 01 03
मंचर-भीमाशंकर
कारखाना 01 02
पुणे स्टेशन-
मांडवगण फराटा 01 01

लोकसंख्येनुसार पुणे शहरात गाड्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे आम्ही आणखी नव्या गाड्या खरेदी करीत आहोत. तसेच, आम्हाला ‘पुमटा’च्या बैठकीत पीएमआरडीएच्या हद्दीपर्यंत बससेवा पुरविण्यास परवानगी मिळाली आहे. ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेले अकरा मार्ग आम्ही बंद करीत आहोत. सध्याच्या घडीला या 11 मार्गांवर प्रत्येकी फक्त एक गाडी सुरू आहे. लवकरात लवकर ग्रामीण भागातील ही सेवा पूर्णपणे बंद करण्यात येईल.

                                        – दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

Back to top button