सिंहगडावर पर्यटकांच्या गर्दीचा उच्चांक; सव्वादोन लाखांची टोलवसुली, राजगडावरही झुंबड | पुढारी

सिंहगडावर पर्यटकांच्या गर्दीचा उच्चांक; सव्वादोन लाखांची टोलवसुली, राजगडावरही झुंबड

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा: पावसात चिंब भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी रविवारी (दि. 3) सुमारे तीस हजार पर्यटकांनी सिंहगडावर गर्दी केली होती. त्यामुळे टोल वसुलीचा नवीन उंच्चाक नोंदवला गेला. तब्बल सव्वादोन लाख रुपयांचा टोल वन खात्याने वसूल केला. यंदाच्या हंगामात प्रथमच गडाच्या पायथ्याला पावसाची रिमझिम, तर गडमाथ्यावर संततधार सुरू होती. राजगडावरही संततधारेत पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी तरुणाईबरोबरच ज्येष्ठ नागरिक, महिलांनी गर्दी केली होती. खडकवासला धरण चौपाटी, पानशेत, वरसगाव धरण परिसरही हाऊसफुल्ल झाले होते.

सिंहगड घाट रस्ता, तसेच पुणे-पानशेत रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसह ये-जा करणार्‍या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. गर्दीमुळे सकाळपासून तब्बल आठ ते दहा वेळा सिंहगड घाट रस्ता बंद करण्यात आला. तरीही पर्यटकांची गर्दी ओसरली नाही. गडावर जाण्यासाठी तासन्तास पर्यटक टोल नाक्यावर थाबंत होते. अनेक जण अवसरवाडी, आतकरवाडी अशा पायी रस्त्याने गडावर गेले. सिंहगडावर पर्यटकांची दिवसभरात 3005 दुचाकी व 761 चारचाकी वाहने गेली. पावसाळी पर्यटनांचा आनंद लुटण्यासाठी खडकवासला चौपाटी, खानापूर, पानशेत धरण परिसरात गर्दी केली होती.

पुणे-पानशेत रस्त्यावर डोणजेपासून खडकवासला धरण, नांदेड फाट्यापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली. गडावरील वाहनतळ हाऊसफुल्ल झाल्याने घाट रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सुरक्षारक्षकांना सायंकाळी उशिरापर्यंत कसरत करावी लागली. पावसामुळे घाट रस्त्यावर दरडी कोसळण्याचा धोका असल्याने वन खात्यासमोर पर्यटकांच्या सुरक्षेचे आव्हान आहे. धोकादायक ठिकाणी जाणार्‍या पर्यटकांना रोखण्यासाठी पाहरेकरी बापू साबळे, आकाश कचरे प्रयत्न करीत होते.

राजगडावर तरुणाईची झुंबड
दुर्गम राजगड, तसेच तोरणागडावर संततधारेत तरुणाईची अक्षरशः झुंबड उडाली होती. दिवसभरात राजगडावर दोन हजारांवर पर्यटकांनी हजेरी लावली. युवक-युवतींसह विद्यार्थी, नागरिकांनी गर्दी केली होती. दाट धुक्यात गडासह सभोवतालच्या डोंगररांगा हरवून गेल्या होत्या. पावसामुळे निसरड्या झालेल्या दगडी पायर्‍या पाऊल वाटा, तटबंदी, बुरुजावरून ये-जा करताना पर्यटकांना कसरत करावी लागत आहे.

सिंहगड घाट रस्त्यावर दरडींचा धोका
पायथ्याला रिमझिमीनंतर उघडीप सुरू होती. मात्र, गडाच्या माथ्यावर पावसाची रिपरिप सुरू होती. सिंहगड घाट रस्त्यावर जगताप माची जवळ सकाळी दहाच्या दरडीचा भाग कोसळला. त्यामुळे वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके, वनरक्षक बाबासाहेब जिवडे, नितीन गोळे, रमेश खामकर, तानाजी खाटपे आदींना धावपळ करावी लागली.

Back to top button