जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष! | पुढारी

जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष!

पुणे : पुढारी वृत्तसेवा: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे 82 गट, तर त्याच्या दुप्पट 164 पंचायत समिती गण निश्चित झाले असून, अंतिम प्रभाग रचनाही प्रसिद्ध झाल्याने आता आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूत्रानुसार जिल्ह्यातील 8 गट अनुसूचित जातीसाठी तर सहा गट अनुसूचित जमातींसाठी आरक्षित होणार आहेत. राज्यातील सत्तानाट्य रंगात असताना आता जिल्हा परिषद पंचायत समिती आरक्षण कधी निश्चित होतायत यासाठी इच्छुक देव पाण्यात घालून बसले आहेत. आता या निवडणुकांचा राजकीय पॅटर्न सत्तांतरामुळे बदलला आहे.

त्यामुळे उमेदवारी कोणाकडे मागावी कोठे प्रयत्न करावेत आपला दुसरा पर्याय काय आहे यावर इच्छुक उमेदवार विचार करत असताना आरक्षण हा मोठा अडथळा त्यांच्या समोर आहे. पुणे जिल्ह्यात आता शिवसेनेच्या इच्छुकांना भूमिका घ्यावी लागणार आहे तर प्रबळ राष्ट्रवादी मधून उमेदवारी न मिळाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा पर्याय ही इच्छुकांसमोर असल्याने आता आरक्षण जाहीर झाल्यास त्यांना पुढे चाल करता येणार आहे. जिल्हा परिषदेच्या जुन्या रचनेप्रमाणे 75 गट, तर पंचायत समितीचे 150 गण अस्तित्वात होते. नव्या रचनेनुसार 82 गटांची निर्मिती झाली, तर त्याच्या दुप्पट 164 गण तयार झाले. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर सूचना व हरकती निकाली काढण्यात आल्या आहेत.

पुणे जिल्हा परिषद कार्यक्षेत्र असलेल्या ग्रामीण क्षेत्रातील एकूण लोकसंख्या 33 लाख 48 हजार 495 आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे तीन लाख 14 हजार 776 तर अनुसूचित जमातीसाठीचे दोन लाख 51 हजार 445 नागरिक आहेत. निवडणूक आयोगाने गट आणि गणाच्या आरक्षणाचे सूत्र ठरवून दिले. त्यानुसार जिल्ह्यातील 8 गट अनुसूचित जातीसाठी तर सहा गट अनुसूचित जमातींसाठी आरक्षित होणार आहेत.

असे ठरेल आरक्षण
आरक्षणासाठी अनुसूचित जाती आणि जमाती या प्रवर्गातील गट निश्चित करताना संबंधित प्रवर्गाच्या लोकसंख्येला जिल्ह्यातील एकूण ग्रामीण लोकसंख्येने भागले जाईल. त्यानंतर येणार्‍या गुणोत्तराला एकूण गट संख्येने गुणले जाईल. त्यानंतर येणारा आकडा त्या प्रवर्गासाठी आरक्षित गटांचा असेल. या सूत्राप्रमाणे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 7.70 म्हणजेच 8 तर अनुसूचित जमातीसाठी 6.15 म्हणजेच 6 जागा निश्चित होत आहेत.

Back to top button