पुणे : हडपसर येथून २५ लाखांचा गुटखा जप्त; ८ दिवसांत दुसरी मोठी कारवाई | पुढारी

पुणे : हडपसर येथून २५ लाखांचा गुटखा जप्त; ८ दिवसांत दुसरी मोठी कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कर्नाटकातून गुटखा आणून त्याची टेम्पोमधून विक्री करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून टेम्पोसह २५ लाख ८० हजारांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ जप्त केले. प्रकाश प्रेमाराम भाटी (वय ३३, फ्लॅट क्र. २०५ ए, समर्थ कान्हा, कात्रज, कोंढवा रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक येथून बेकायदेशीररित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथक २ मधील अंमलदार अमोल पिलाने आणि चेतन शिरोळकर यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांना माहिती दिली. त्यानुसार मुंढवा- हडपसर रोडवरील नोबेल हॉस्पीटलजवळ एक टेम्पो संशयास्पद उभा होता. त्या टेम्पोची तपासणी केली असता त्या टेम्पोत गुटख्याने भरलेली तब्बल ४० पोती पोलिसांना आढळून आली. त्या पोत्यांमध्ये तब्बल २५ लाखांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ होते.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे, सचिन अहिवाळे, किशोर बर्गे, रवी सपकाळ आणि आशा कोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ दिवसांत ७७ लाखांचा गुटखा जप्त

चार दिवसांपूर्वी हैद्राबादकडून मुंबईकडे होणारी गुटख्याची वाहतूक अन्न औषध प्रशासनाने रोखली होती. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहतूक होताना तब्बल ५२ लाख १८ हजारांचा गुटखा व १० लाखांचा एक ट्रक असा ६२ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. या घटनेला चार दिवस होताहेत तोच आता खंडणी विरोधी पथकाने तब्बल २५ लाखांचा गुटखा जप्त केला आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन तसेच गुन्हे शाखेला अवैध गुटखा वाहतुकीबाबत माहिती मिळते. स्थानिक पोलिसांना का नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

कर्नाटक येथून या गुटख्याची वाहतूक मुंढवा परिसरात होणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून एकाला ताब्यात घेत त्यांच्याकडून गुटखा, तंबाखुजन्य पदार्थसह तब्बल २५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित आरोपीकडे चौकशी केल्यानंतर जप्त केलेला गुटखा मुंढवा परिसरात विविध ठिकाणी पुरवणार असल्याचे त्याने सांगितले.
– बालाजी पांढरे, खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखा

हेही वाचलंत का ? 

Back to top button