ई-पीक पाहणी अ‍ॅपबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण | पुढारी

ई-पीक पाहणी अ‍ॅपबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

पुणे : पुढारी वृत्तसेवा: ई- पीक पाहणी मोबाईल अ‍ॅप द्वारे राज्यात शेतकर्‍यांमार्फत पीक पाहणी नोंदवण्याची प्रक्रिया गेल्या वर्षापासून सुरू आहे. यावर्षीचा खरीप हंगाम सुरू होत आहे व या हंगामात जास्तीत जास्त शेतकर्‍यांकडून पिकांची नोंदणी व्हावी, या उद्देशाने कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले होते. चारही कृषी विद्यापीठांच्या कृषी महाविद्यालयातील चौथ्या वर्षाचे विद्यार्थी हे त्यांच्या सातव्या सेमिस्टर मध्ये कार्यानुभावासाठी पूर्ण सेमिस्टर हे एखाद्या गावामध्ये पाठवले जातात.

त्यावेळेस सदर गावांमध्ये त्यांचा प्रशिक्षणाच्या अनुषंगाने गावातील शेतकर्‍यांशी जवळून संबंध येतो. यामुळे या विद्यार्थ्यांना तसेच कृषी महाविद्यालयातील प्रथम , द्वितीय व तृतीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना राज्यशासनाच्या ई पीक पाहणी प्रकल्पाची माहिती देणे व मोबाईल अ‍ॅपचे प्रशिक्षण देण्याच्या अनुषंगाने जमाबंदी आयुक्त यांनी दिलेल्या सूचनेनुसार व महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्या सहकार्याने हे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना ई- पीक पाहणी प्रकल्प व ई पीक पाहणी मोबाईल अ‍ॅप बाबतचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये ई-पीक पाहणी प्रकल्पाचे समन्वयक श्रीरंग तांबे, कृषी अधिकारी गणेश घोरपडे,महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण संचालक हरिहर कौसडीकर, व तहसीलदार (ई-पीक पाहणी) बालाजी शेवाळे यांनी मार्गदर्शन केले.

Back to top button