आयटी तरुणींचा नवा फंडा; ‘वर्क फ्रॉम होम’मुळे जिम, योग आणि झुंबा डान्सला देताहेत प्राधान्य

सुवर्णा चव्हाण

पुणे : ‘वर्क फ्रॉम होम’मध्ये अडकलेल्या आयटी क्षेत्रातील तरुणी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिम, योग आणि झुंबा डान्सकडे वळल्या आहेत. 20 ते 40 वयोगटातील तरुणी फिटनेसला प्राधान्य देत आहेत आणि त्यामुळे त्यांना आरोग्यसंपन्न जगण्याचा, तणावमुक्त राहण्याचा मूलमंत्र मिळाला आहे. दोन वर्षांपासून काही आयटीतील तरुणी वर्क फ्रॉम होम करत आहेत. पण यामुळे त्यांना स्त्रीरोग, मासिक पाळीतील समस्येसह ताणतणाव, आहार सेवनाच्या वेळा ठरलेल्या नसल्यामुळे अ‍ॅसिडिटी, स्थूलपणा अशा आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यासह चिडचीड, निराशा अशा गोष्टींनाही त्या सामोर्‍या जात आहेत.

अशा वेळी स्वत:ला फिट आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी तरुणी जिमकडे वळल्या आहेत. एका नियोजित वेळेत वर्कआउट आणि त्याला साजेसा ‘प्रोटीन डाएट’ घेऊन त्या स्वत:ला फिट ठेवत आहेत. याशिवाय योग, ध्यानधारणेमुळे त्यांना मन:शांती मिळत असून, झुंबा वर्गाचाही फायदा त्यांना फिटनेस राखण्यासाठी होत आहे. पुणे फिटनेस क्लब असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश काळे म्हणाले, ‘काही फिटनेस प्रशिक्षक घरी जाऊन तरुणींना प्रशिक्षण देत आहेत. आयटीतील तरुणींनी नक्कीच फिटनेसकडे लक्ष दिले पाहिजे. घरबसल्या व्यायाम केला पाहिजे.

प्रमाणपत्र असलेल्या फिटनेस प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घ्यावे. वेळेत आणि समतोल आहार घेण्याकडे लक्ष द्यावे. पाणीही भरपूर फिटनेस प्रशिक्षक रोहिणी पोटे म्हणाल्या, ‘वर्क फ्रॉम होमला कंटाळलेल्या तरुणी आता फिटनेसकडे वळल्या आहेत. घरबसल्या काहींमध्ये स्थूलपणा आणि काहींमध्ये शारीरिक दुखण्याला सुरुवात झाल्याने व्यग्र दिनक्रमातून सायंकाळी त्या वर्कआउटसाठी वेळ काढत आहेत. त्यांच्याकडून सर्व माहिती घेऊन आणि त्यांची आरोग्याची समस्या लक्षात घेऊन त्यानुसारच त्यांना वर्कआउट आणि डाएट सांगितला जात आहे.’

वर्क फ्रॉम होममुळे दिवसभराचे रुटीन ठरल्याने स्वत:साठी वेळ काढणेही कठीण बनले होते. पण आता मी जिमलाही वेळ देत असल्याने माझ्यात एक नवी ऊर्जा संचारली आहे. वर्कआउटसाठी मी सकाळी वेळ काढते. वर्कआउट केल्यामुळे ताजेतवाने वाटते. यामुळे कामही आनंदीपणे आणि उत्साहात करता येत आहे.

– दिव्या आर्ते, आयटीतील नोकरदार तरुणी

Exit mobile version