जुन्नर येथील मिनी फूड पार्कला ‘खो’; जागा देण्यास महामंडळाचा नकार | पुढारी

जुन्नर येथील मिनी फूड पार्कला ‘खो’; जागा देण्यास महामंडळाचा नकार

पुणे : पुढारी वृत्तसेवा: ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यात टोमॅटो हे पीक निवडण्यात आले होते. त्यासाठी जुन्नर तालुक्यात टोमॅटो प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी मिनी फूड पार्कला जागा जिल्हा परिषदेने मागितली होती. मात्र, ही जागा देण्यास कृष्णा खोरे विकास महामंडळाने नकार दिला आहे. परिणामी, पार्क होण्यास विलंब होणार असून, त्यासाठी पर्यायी जागा शोधावी लागणार आहे.
जुन्नर तालुक्यात टोमॅटोचे क्षेत्र जास्त असल्याने त्यावर प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या तीन योजनांचे अनुदान एकत्र करून मिनी फुड पार्क उभारण्याची योजना आहे.

याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, ’महामंडळाच्या जागेत काही बांधकामे आहेत. त्याचा वापर या फुड पार्कसाठी करता आला असता. महिला बचत गटांसाठी ती फायदेशीर ठरली असती. मात्र, आता ही जागा नाकारल्याने दुसरी पर्यायी जागा शोधण्यात येईल. जुन्नरमध्ये शेती क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे उद्योग वाढलेले नाहीत. या पार्कमुळे उद्योगांना चालना मिळाली असती. आता दुसर्‍या जागेसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची मदत घेऊन गायराने शासकीय जागा शोधून त्या भाड्याने घेता येतील का? याची चाचपणी केली जाईल. तेही शक्य न झाल्यास भूसंपादन केले जाईल.’

टोमॅटोवरील अनेक पदार्थ तयार करणारे उद्योग उभारण्याचा प्रस्ताव आहे. महिला बचत गटांनाही यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. तालुक्यात सुमारे 30 हजार महिला बचत गटांचा सहभाग आहे. त्यामुळे या मिनी फूड पार्कसाठी नारायणगाव येथे जागा शोधण्यात आली. ही 16.90 हेक्टर जागा कृष्णा खोरे महामंडळाच्या ताब्यात आहे. यातील पाच एकर जागा मागण्यात आली होती. मात्र, ती नाकारण्यात आली आहे.

Back to top button