विद्यापीठात आता निवडणूक ‘फीवर’; आतापर्यंत 51 हजार मतदारांची नोंदणी | पुढारी

विद्यापीठात आता निवडणूक ‘फीवर’; आतापर्यंत 51 हजार मतदारांची नोंदणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यंदा होणार्‍या विविध अधिकार मंडळांच्या निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तब्बल 51 हजार मतदारांनी नावनोंदणी केली आहे. या नोंदणीत अधिकाधिक सहभाग वाढवा यासाठी विद्यापीठाने नावनोंदणीला मुदतवाढ दिली असून पदवीधर, शिक्षक आणि संस्था प्रतिनिधींना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांची निवडणूक प्रक्रिया 1 जून 2022 पासून सुरू झाली आहे.

या प्राधिकरणांची मुदत पुढील पाच वर्षांसाठी असणार आहे. मतदारांच्या नोंदणीसाठी विद्यापीठाने election.unipune.ac.in हे वेब पोर्टल तयार केले आहे. या माध्यमातून पदवीधर घरबसल्या आपली नोंदणी करू शकतात. जुन्या मतदारांनाही पुन्हा नोंदणी करणे आवश्यक असते. ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी. नोंदणीसाठी पदवीधरांना 14 जुलैपर्यंत, प्राचार्य, शिक्षक व विभागप्रमुख यांना 13 जुलैपर्यंत तर संस्था प्रतिनिधी मतदारसंघासाठी 10 जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. यापूर्वी नावनोंदणीसाठी अनुक्रमे 4, 3 जुलै व 30 जून 2022 अशी अंतिम तारीख देण्यात आली होती.

  • नाव नोंदणीसाठी लिंक – https://election.unipune.ac.in/Ele-pp/Registration/RgšRegistration2017.aspx

गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी ध्येयधोरण ठरविण्यात विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांची भूमिका मोठी आहे. यामुळे या निवडणुकीसाठी पदवीधर, शिक्षक, विभागप्रमुख आणि संस्थाचालक या सर्व घटकांच्या व्यापक सहभागातून लोकशाही प्रक्रिया बळकट होईल.

                           – डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Back to top button