पिंपरी : काँग्रेससमोरची आव्हाने वाढली | पुढारी

पिंपरी : काँग्रेससमोरची आव्हाने वाढली

राहुल हातोले : पिंपरी : राज्यात झालेल्या सत्ताबदलामुळे महाविकास आघाडीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शहर पातळीवर काँग्रेससमोर आव्हान निर्माण झाले आहे. शहर काँग्रेसचा खोलात असलेला पाय आणखी खोलात जाण्याची शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या महापालिका निवडणुकीत काँगे्रसने 65 उमेदवार रिंगणात उभे करूनही पक्षाला यश मिळाले नाही. पक्षाला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. पक्षाला अपयशाला सामोरे जावे लागले. पालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी शिवसेनेतील गटबाजीमुळे राज्यात सत्तापालट झाला आहे.

या घटनांमुळे कॉँग्रेस पक्षासमोरे पालिका निवडणुकीसाठी आव्हान निर्माण झाले आहे. राज्यात पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी होणार की, स्वतंत्रपणे लढावे लागणार याकडे शहर काँगे्रसचे लक्ष लागले आहे. पालिका निवडणुकीत पक्षाला यशाकडे घेऊन जाण्यासाठी शहर काँगे्रसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे हे निश्चित शहर काँगे्रसमधील आपआपसांतील हेवेदावे, गटतट बाजूला ठेवून पक्षाने प्रयत्न केल्यास शहरात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व निर्माण होऊ शकेल, असे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी शहरातील पाणीप्रश्न, कामगार समस्या आदींसह अग्निपथ योजनेला विरोध करत आंदोलनाच्या माध्यमातून पालिका निवडणुकीसाठी कंबर कसली असून, पक्षाला यशाच्या मार्गावर घेऊन जाण्याचा चंग बांधला आहे. शहरातील भाजपचे स्वीकृत नगरसेवक बाबू नायर यांनी पक्षात प्रवेश केल्याने काँगे्रसला बळ मिळाले आहे. पुढील काळात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यार्ंना महाविकास आघाडी व्यतिरिक्त स्वबळावर निवडणूका लढविण्याची तयारी देखील ठेवावी लागणार असल्याची चर्चा होत आहे.

भाजपने मिळविलेले यश हे धोकेबाजीने मिळविले आहे. याला जनतेची मान्यता नसताना सत्तेवर आलेले सरकार म्हणावे लागेल. ईडी, सीबीआय सारख्या संस्थाचा गैरवापर करून ही सत्ता मिळाल्याने त्याचा गवगाव किती करावा हा देखील एक प्रश्नच आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार महाविकास आघाडी झाली तर योग्यच आहे. मात्र नाही झाली तरी आम्ही यशस्वी लढा देऊ, आणि महापौर हा काँग्रेसचाच असणार आहे. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
– डॉ. कैलास कदम, पिंपरी-चिंचवड शहर व जिल्हा अध्यक्ष.

Back to top button