शंकेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान | पुढारी

शंकेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा: ‘धन्य धन्य जन्म तयांचा..जाई नेमी पंढरीसी’ असे म्हणत टाळघोषाच्या गजरात व मृदंगाच्या निनादात शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील शंकेश्वर महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. शंकेश्वर महाराज प्रासादिक पायी दिंडी सोहळयाचे हे नववे वर्षे आहे. शुक्रवारी (दि.1) सकाळी मान्यवरांच्या हस्ते कलश, तुळस, वीण, रथपूजन झाले. पूजनानंतर टाळ व मृदंगाच्या गजरात पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. मानेमळा, फराटेवाडी येथे चहापान व नाष्ट्याची सोय केली होती.

पालखीचे पंढरपूरपर्यंत एकूण नऊ मुक्काम होणार असून, ठिकठिकाणी भजन, कीर्तन व हरिजागर होणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. पालखी सोहळ्यात चोपदार म्हणून शिवाजी केदारी, प्रवीण गोरे, दत्तात्रय लोंढे आदी काम पाहणार असल्याची माहिती दिंडी सोहळ्याचे मार्गदर्शक बबन कदम यांनी दिली. प्रस्थान प्रसंगी कोरोना महामारीत निधन झालेल्या सदस्यांना ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 

Back to top button