पिंपरी : डंपरच्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू | पुढारी

पिंपरी : डंपरच्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू

पिंपरी : भरधाव डंपरने धडक दिल्याने शाळेतून घरी जात असलेल्या तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. गुरुवारी (दि. 30) दुपारी सव्वा चारच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर भारतमाता चौक, नाशिक येथे हा अपघात झाला. शंभो अर्जुन साठे (13, रा. मोशी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी वडील अर्जुन साठे (46) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चालक आनंद गोविंद केंद्रे (44, रा. अबुलगा, ता. कंधार, जि. नांदेड) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस उपनिरीक्षक अशोक तरंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा शंभो हा मोशी येथील नागेश्वर शाळेत नववीच्या वर्गात शिकत होता. दरम्यान, गुरुवारी शाळा सुटल्यानंतर मित्रांसोबत घरी जात होता. त्यावेळी भारतमाता चौकात आरोपी चालवत असलेल्या डंपरने शंभो याला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे शंभो रस्त्यावर पडला. त्यानंतर डंपरच्या मागचे चाक अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Back to top button