तळेगाव दाभाडे : पावसामुळे भात पिकाला जीवदान | पुढारी

तळेगाव दाभाडे : पावसामुळे भात पिकाला जीवदान

तळेगाव दाभाडे : परिसरात पावसाच्या आगमनामुळे खरीप भात पिकाच्या रोपांना जीवदान मिळणार असल्यामुळे शेतकरी आनंदात दिसत आहे. सर्वसाधारणपणे दरवर्षी मान्सूनच्या पावसाची सुरूवात 7 जूनच्या सुमारास होत असते. मात्र, यावर्षी संपूर्ण जून महिना पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे शेतकरीवर्गात नाराजी पसरली होती. गुरुवारपासून मावळ तालुक्यात हलक्या पावसाची सुरूवात झाली असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

मावळ तालुक्यातील काही शेतकर्‍यांनी पाण्याची सुविधा उपलब्ध आहे अशा ठिकाणी भात रोपांची पेरणी केली होती. मात्र, पावसाने प्रचंड ताण दिल्यामुळे भात रोपे नष्ट होतात की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. आता पावसाची सुरुवात हळुहळु का होईना पण झाली असल्यामुळे शेतकर्‍यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

सध्या परिसरातील शेतकरी भात लावणीचे नियोजन करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. मावळ तालुका हा भात पिकविणारा तालुका असल्याने यंदा कृषी विभागाने 13 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर खरीप भातपीक घेण्याचे नियोजन
केले आहे. तसेच, अधिक उत्पादनासाठी शेतकर्‍यांमध्ये जनजागृती केली असल्याचे मावळ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय पडवळ
यांनी सांगितले.

 

Back to top button