१२ आमदार नियुक्ती : 'राज्यपालांवर मला बोलण्याचा अधिकार नाही' - पुढारी

१२ आमदार नियुक्ती : 'राज्यपालांवर मला बोलण्याचा अधिकार नाही'

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : १२ आमदार नियुक्ती राज्यपालांवर मला बोलण्याचा अधिकार नाही. पण पुढच्या आठवड्यात मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोघे मीळून राज्यपालांना जाऊन भेटणार आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. विधानभवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्य सरकार माझ्याकडे १२ आमदार नियुक्ती चा आग्रह धरत नाही. तुम्ही का आग्रह धरता?; असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेत्याला केला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या मुद्द्यावरून राज्यपालांवर टीका केली होती. या संदर्भात बोलताना पवार म्हणाले,  मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांना भेटणार आहे,

राज ठाकरेंना प्रत्युत्तर

यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही प्रत्युत्तर दिलं. शरद पवार साहेबांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. कधी तरी काही लोकं असं बोलून जातात, मात्र त्याला महत्व देण्याचं काम नाही, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. आम्ही पुरोगामी आहोत. पुरोगामी विचारानेच आम्ही काम करत असतो, असेही त्यांनी सांगितले.

हातामध्ये गंडा, कंडा घालत नाही

आम्ही हातामध्ये गंडा, कंडा घालत नाही, काही जण अजूनही अशा अंधश्रद्धा अशा बाबींना बळी पडत आहेत. राज्यासह देशात आपल्याला अनेक भोंदूगिरी बाबा दिसतात. नागरिक त्याला बळी पडत आहेत. अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. चुकीच्या प्रकारे कोणी नागरिकांची फसवणूक करत असेल त्याला पाठीशी घालण्याची गरज नाही.

स्वर्गीय नरेंद्र दाभोळकर यांच्या बरोबर चर्चा करून जादुटोणा कायदा लागू केला. आम्ही हातामध्ये गंडा, कंडा कधी घालत नाही. अशाप्रकारच्या जादूटोण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढत असल्या तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे.

रूग्ण संख्या कमी होतेय

पुण्यात कोरोना आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील परिस्थितीची माहिती दिली. अजित पवार म्हणाले की, पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. तसंच लसीकरण जास्ती जास्त करण्याचा प्रयत्न आहे. लसीकरणाचा ७० लाखांचा टप्पा पार केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

पहिल्या डोस आधी दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येईल. पहिले दोन डोस दिल्यानंतर बूस्टर डोसचं पाहू असंही अजित पवार म्हणाले.

:गेल्या महिन्यात पुण्यात १६ लाख नागरिकांचे लसीकरण झाले, अशी माहितीसुद्धा अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जागतिक स्तरावर माहिती घेतली तर ५ ते ६ लाख दररोज रुग्ण आढळत आहेत.

Back to top button