निविदेवर कामाचे आदेशच नाहीत; राष्ट्रीय समाज पक्ष आंदोलनाच्या तयारीत | पुढारी

निविदेवर कामाचे आदेशच नाहीत; राष्ट्रीय समाज पक्ष आंदोलनाच्या तयारीत

बारामती:  पुढारी वृत्तसेवा: बारामती नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छतेविषयक 15 कोटींच्या निविदा काढण्यात आल्या. परंतु प्रशासनाकडून अद्यापही कामाचे आदेश दिले गेले नाहीत. त्यामुळे प्रशासनाने त्वरित नवीन निविदा काढाव्यात, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. अमोल सातकर यांनी दिला आहे.

नगरपरिषद हद्दीतील प्रत्येक भागातील घरांतून, व्यावसायिकांकडून ओला व सुका कचरा विलगीकृत स्वरूपात गोळा करून घन कचरा प्रक्रिया प्रकल्पापर्यंत वाहून नेण्यासाठी आरोग्य विभागाकडून 18 फेब्रुवारी रोजी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. निविदेचा कालावधी 95 दिवसांचा होता. परंतु 120 पेक्षा अधिक दिवस उलटून गेल्यावरही कामाचे आदेश काढण्यात आले नाहीत.
शासनाने घालून दिलेल्या नियमांचे बारामती नगरपरिषद प्रशासनाने उल्लंघन केले असल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाने केला.

पालिकेने तत्काळ फेरनिविदा काढावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत अ‍ॅड. सातकर म्हणाले, जाचक अटी व शर्ती पालिकेने कमी करणे गरजेचे आहे. स्थानिक ठेकेदार व स्थानिकांच्या हाताला काम मिळेल या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी. स्वच्छता व आरोग्य हा नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

 

Back to top button