सांस्कृतिक राजधानी नावालाच; प्रत्यक्षात काहीच केले नाही... | पुढारी

सांस्कृतिक राजधानी नावालाच; प्रत्यक्षात काहीच केले नाही...

पुणे: पुढारी वृत्तसेवा: पुण्याला कला आणि सांस्कृतिकतेचा मोठा वारसा लाभला आहे. सांस्कृतिक घडामोडीमुळे पुण्याची एक वेगळी ओळख जगभरात आहे. पुण्यातील सांस्कृतिक कार्यक्रम-उपक्रम नेहमीच नावाजले जातात. दिग्गजांसह नवोदित कलाकारांची मांदियाळी पुण्यात आहे. पण कोरोना आला अन् सर्वकाही ठप्प झाले. कला आणि सांस्कृतिक विश्वाला ब्रेक लागला. अशा वेळी सरकार कोरोनाशी लढा देण्यात व्यग्र असल्याने सांस्कृतिक क्षेत्राकडे मात्र सरकारचे दुर्लक्ष झाले अन् कलाकारांच्या पदरी आर्थिक मदतीशिवाय काहीच मिळाले नाही… गेल्या अडीच वर्षांत पुण्याच्या सांस्कृतिक विश्वासाठी अशी ठोस घोषणा सरकारने केली नाही.त्याचा फटका सांस्कृतिक क्षेत्राला सहन करावा लागला. तत्कालीन सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांनी पुण्यात एक-दोन कार्यक्रमांच्या निमित्ताने भेट दिली खरी, पण त्या वेळी त्यांनी कोणतीही घोषणा केली नाही.

वारसा स्थळ हक्कांचे काय होणार… मार्चमध्ये तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात पुण्याच्या संदर्भात एक-दोन घोषणा केल्या होत्या. त्यात फुले दाम्पत्याचे पुण्यातील निवासस्थान फुले वाडा राज्य संरक्षित वारसा स्थळ स्मारक विस्तारीकरणासाठी 100 कोटींचा निधी देणे, राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या मौजे पाल खुर्द (ता. वेल्हे, जि. पुणे) येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री महाराणी सईबाई यांच्या स्मृतिस्थान परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे यासह श्री संत जगनाडे महाराज यांचे समाधिस्थळ असलेल्या सुदुंबरे (ता. मावळ, जि. पुणे) या क्षेत्राला तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळाचा दर्जा देणे, स्मारकाचा विकास आणि परिसरातील सौंदर्यीकरणासाठी 10 कोटींचा निधी देणे, अशा काही घोषणा त्यांनी केल्या होत्या. पण, आता नवीन सरकार आल्यामुळे या घोषणांचे पुढे काय होणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Back to top button