बी.व्होक.च्या विद्यार्थ्यांना आता अर्थार्जनाचीही संधी | पुढारी

बी.व्होक.च्या विद्यार्थ्यांना आता अर्थार्जनाचीही संधी

पुणे : पुढारी वृत्तसेवा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘बी. व्होक. इन रिटेल मॅनेजमेंट’च्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना बुधवारी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते ‘लेटर ऑफ इंटर्नशिप’ प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी विद्यापीठातील अधिष्ठाता व कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. पराग काळकर, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक व अधिष्ठाता डॉ. दीपक माने, कौशल्य विकास केंद्रातील प्राध्यापक व अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. रवी आहुजा यांच्यासह अनेक शोरूमचे डीलर उपस्थित होते.

कोरोना काळात अनेकांच्या हाताला रोजगार नव्हता. त्यामुळे शिकत शिकत विद्यार्थ्यांना काम करता यावे व त्यांचा कौशल्य विकास व्हावा, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मारुती सुझुकी इंडिया लिमटेडसोबत सामंजस्य करार करत नवीन ‘बी. व्होक इन रिटेल मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम 2021-22 पासून सुरू केला आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना आता शिकत शिकत काम करून अर्थार्जन करण्याची संधी मिळाली आहे. ’बी.व्होक इन रिटेल मॅनेजमेंट’ या अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचमधील सर्वच्या सर्व 23 विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली आहे. या वर्षीची बी. व्होक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून याबाबतची सर्व माहिती विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या संकेस्थळावर देण्यात आली आहे.

Back to top button