वडगाव मावळ : बाजारपेठेतील अतिक्रमण हटवा | पुढारी

वडगाव मावळ : बाजारपेठेतील अतिक्रमण हटवा

वडगाव मावळ : वडगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत सातत्याने होणार्‍या वाहतूक कोंडीला पोलिस प्रशासनही कंटाळले असून, थेट पोलिस निरीक्षकांनीच नगरपंचायत मुख्याधिकार्‍यांना बाजारपेठेतील अतिक्रमण काढावे व त्यासाठी बंदोबस्त देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे अतिक्रमण कारवाई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून प्रामुख्याने बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. वडगाव शहर हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने या ठिकाणी तहसील कार्यालय, न्यायालय, पंचायत समिती, भूमिअभिलेख, वन, दुय्यम निबंधक अशी सर्व शासकीय कार्यालय आहेत.

याशिवाय नुकतेच वडगाव न्यायालयामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाचे कामकाज सुरू झाले आहे. त्यामुळे शहरात प्रामुख्याने बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ वाढली आहे. त्यात शहरातील मुख्य रस्ता असलेल्या बाजारपेठेच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

सातत्याने होणार्‍या या वाहतूक कोंडीला नागरिकांसह पोलिसही वैतागले आहेत. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण त्वरित काढावे असे लेखी पत्र पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी नगरपंचायत मुख्याधिकार्‍यांना दिले आहे. अतिक्रमण कारवाईसाठी पोलिस बंदोबस्तही देण्याची तयारी दर्शवली आहे.

प्रकाश आबिटकर यांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी?

सद्यःस्थितीत आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या बाजारपेठेतील मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून, या कामाची सुरुवात 10 मीटर काँक्रीट व दोन्ही बाजूंना प्रत्येकी 1 मीटर पेव्हिंग ब्लॉक व त्याखाली ड्रेनेज, पाणी व विद्युतलाईन या पद्धतीने सुरू करण्यात आले होते.

त्यानंतर मात्र शिवाजी चौकापासून यामध्ये बदल करण्यात आला असून 10 मीटर काँक्रीट व त्याखालीच ड्रेनेज, पाणी व विद्युतलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुढे बाजारपेठेतही हा रस्ता 10 मीटर रुंदीचाच होण्याचीच शक्यता आहे. वास्तविक हा रस्ता आणखी रुंद होणे गरजेचे आहे.

या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनेकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून पक्की बांधकामे केली आहेत. काही दुकानदारांनी दुकानापुढे शेड मारून रस्त्यावर वस्तू मांडल्या आहेत. त्यामुळे दुकानात येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहन पार्किंग करून दुकान जातात आणि त्यामुळे वाहतूककोंडीला सुरुवात होते.

सतत होणार्‍या या वाहतूककोंडीमुळे नागरिक, व्यापारी यांचे आपापसात वाद होण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवणे गरजेचे आहे. यासाठी नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांना पत्र दिले असल्याचे पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी सांगितले.

हद्दीच्या वादात वाढली अतिक्रमणे !
वडगाव शहरातील मुख्य रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा असून या रस्त्याच्या दुतर्फा अनेकांनी पक्की बांधकामे, पत्राशेड उभी केली आहेत. संबंधित कामे ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत येत असल्याने नगरपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. तर, संबंधित कामे ही नगरपंचायत हद्दीत येत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. याशिवाय नगरपंचायतचे अधिकारीही या अनधिकृत बांधकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने भर रस्त्यात पक्की बांधकामे झाली आहेत. त्यामुळे हद्दीच्या वादात शहरामध्ये अतिक्रमणे वाढली असल्याचे दिसते.

Back to top button