वीज मीटरचे रीडिंग अचूकच घ्यायला हवे; महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांची सूचना | पुढारी

वीज मीटरचे रीडिंग अचूकच घ्यायला हवे; महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांची सूचना

पुणे : पुढारी वृत्तसेवा: ‘ वीज मीटरचे रीडिंगला जबाबदार असणार्‍या महावितरणच्या अधिकार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी मीटर रीडिंग एजन्सींचे संचालक व प्रतिनिधींच्या बैठकीत नुकताच दिला.
गेल्या दोन महिन्यांपासून अचूक रीडिंगसाठी सुधारणा न करणे, वीज मीटर योग्य स्थितीत असूनही हेतुपुरस्सर नादुरुस्तीचा (फॉल्टी) शेरा देणे, सरासरी किंवा चुकीचे रीडिंग घेणे आदी प्रकार दिसून आल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील तीन व पुणे जिल्ह्यातील दोन अशा पाच मीटर रीडिंग एजन्सीजना या बैठकीतच तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले. तसेच महावितरणच्या संबंधित तीन कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

पुणे प्रादेशिक विभागाअंतर्गत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 110 मीटर रीडिंग एजन्सीजचे संचालक व प्रतिनिधींची पुणे येथील ’प्रकाश भवना’मध्ये बैठक झाली. यावेळी ताकसांडे यांच्यासह कार्यकारी संचालक (देयके व महसूल) योगेश गडकरी, प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे, मुख्य अभियंता संजय पाटील (देयके व महसूल), सचिन तालेवार (पुणे), सुनील पावडे (बारामती), परेश भागवत (कोल्हापूर) उपस्थित होते. या बैठकीत एका सादरीकरणाद्वारे एजन्सीकडून होणार्‍या फोटो मीटर रीडिंगमधील चुका, सदोष रीडिंग, मीटर नादुस्तीबाबत चुकीचे शेरे आदींची माहिती देऊन त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत एजन्सीजच्या संचालकांना उपाय सांगण्यात आले.

ताकसांडे म्हणाले, ‘मीटर रीडिंग हा बिलिंगचा मुख्य आधार आहे. त्यात 100 टक्के अचूकता पाहिजेच. परंतु चुकीचे किंवा सदोष रीडिंग घेतल्यास महावितरणच्या महसुलाचे नुकसान आणि ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा नाहक त्रास होतो. ही बाब अजिबात खपवून घेतली जाणार नाही. मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध केवळ कारवाई करणे हा मुख्य उद्देश नाही. परंतु रीडिंगसाठी जे अचूकतेचे, गुणवत्तेचे मापदंड आहेत त्यात कुचराई झाल्यास एजन्सीज व महावितरणच्या अधिकार्‍यांविरुद्ध कारवाई केली जाईल. बिलिंग किंवा रीडिंगमध्ये कोणतीही अनियमितता आढळल्यास ताबडतोब उपाय करावेत व ग्राहकांना अचूक बिल देण्यात येईल याची काळजी घ्यावी.’

Back to top button